अनंत जाधव ल्ल दोडामार्ग दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेली वनसंपदा जतन करण्याच्या उद्देशाने तिलारी परिसरातील ११ गावांत वनअभयारण्य करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यांचा प्रस्ताव राज्यशासनाच्या वनखात्याकडे देण्यात आला असून, या प्रस्तावानंतर शनिवारी वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी अधिकाऱ्यांसमवेत तिलारी परिसरातील अभयारण्य करण्यात येणाऱ्या काही गावांची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना केल्या. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या वनसंपदेचे जतन झाले पाहिजे, या उद्देशाने वनविभागाने तिलारी परिसरातील ११ गावांच्या वनसंपदेत अभयारण्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तिलारी परिसरातील सरगवे, पाट, पाळ्ये, केंद्रे, बांबवडे, शिरंगे, आदी गावांना धरून वनअभयारण्य तयार करण्याचे ठरविले आहे. तब्बल तीन हजार हेक्टर जागेत हे अभयारण्य होणार असून, वनविभागाने याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच वनविभागाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी देण्यात आली नसून, त्यादृष्टीने वनसचिवांनी या जागेची पाहणी केली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असल्याने वनविभागाला कॅमेऱ्यामध्ये वाघ, हत्ती, अस्वल, असे अनेक प्राणी आढळून आले आहेत, तर काही प्राण्यांच्या पायांचे ठसेही प्राप्त झाले आहेत. कर्नाटकमधील खानापूर या परिसरातून सिंधुदुर्गमध्ये दाखल झालेले हत्ती हे मांगेली पाट्येमार्गे दोडामार्गमध्ये आले होते. आजही त्या भागात चार ते पाच हत्तींचे वास्तव्य असल्याचे वनविभागाने मान्य केले आहे. त्यामुळे हा भाग संरक्षित करून तेथे वनविभाग अभयारण्य करण्यावर ठाम आहे. तिलारी परिसर हा महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांची सीमारेषा आहे. त्यामुळे याचा फायदा तीन राज्यांतील वन्यप्राण्यांना होणार असून, वन्यप्राणी कॉरिडॉर तयार करण्याचाच सरकारचा विचार आहे. याचा आराखडा यापूर्वीच वनविभागाने तयार केला आहे. शुक्रवारी सिंधुदुर्गमध्ये आलेले वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी शनिवारी सकाळी दोडामार्गमधील सरगवे, पाटये या भागाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यवनसंरक्षक एम. के. राव, वन्यजीव विभागाचे मुख्य संरक्षक क्लेमेंट बेन, सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, आदी उपस्थित होते. यावेळी सचिव खरगे यांनी अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने अभयारण्य करायचे आहे, तसेच किती जागा अपेक्षित आहे, वन्यप्राण्यांबाबत काय करायचे, या संबंधीच्या सूचना दिल्या आहेत. तब्बल दोन तास त्यांनी या परिसराची पाहणी केली. सचिवांनी फक्त परिसराची पाहणी केली : बांगडी याबाबत सहायक उपवनसंरक्षक सुरेश बांगडी यांना विचारले असता ते म्हणाले, सचिवांनी जागेची पाहणी केली आहे. आमचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे गेला असून, त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
तिलारीतील ११ गावांत वनअभयारण्य
By admin | Published: January 31, 2016 1:16 AM