ओरोस : १९८२ ते २००४ या कालावधीत विविध योजनेंतर्गत वृक्ष लागवड केलेल्या वनमजुरांना वनीकरण विभागाने वाऱ्यावर सोडले आहे. सामाजिक वनीकरण विभागात सुरू झालेल्या नवीन कामांत या सर्व वन मजुरांना सामावून घेऊन कायम करावे. या मागणीसाठी वनमजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी उपोषणस्थळी भेट देत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार वनमजुरांनी केला आहे.सलग १५ ते २० वर्षे ८० जणांनी प्रामाणिक काम करूनही वनीकरण विभागाने आम्हांला वाऱ्यावर सोडले आहे. गेली अनेक वर्षे वनमजूर म्हणून सामाजिक वनीकरण विभागामधून विविध शासनाच्या योजना अंमलात आणल्या. त्या योजनांमध्ये काम केले परंतु आम्ही अशिक्षित असल्याने आम्हांला याची कल्पना नव्हती.
परंतु आमच्यानंतर कामावर हजर झालेल्या सुमारे २० मजुरांना अधिकाऱ्यांनी निकषात बसवत कायम करून घेतले व आम्हांला अचानक कामावरुन कमी केले. आमच्यावर अन्याय झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तरी याची दखल घ्यावी व न्याय मिळावा याकरिता उपोषण सुरू केले असल्याचे वनमजुरांनी सांगितले.१० वर्षांपेक्षा जास्त काम केलेल्या वनमजुरांना सेवेत कायम करावे, ६० वर्षे वय असलेल्यांना पेन्शन चालू करावी, पगार व फरक मिळावा या मागण्यांसाठी हे उपोषण केले आहे. या उपोषणात एकनाथ होडावडेकर, आब्राव फर्नांडिस, मोहन परब, बाळाराम परब, सुरेंद्र घुराणी, प्रसाद सावंत, उषा गायकवाड, विजय ठाकूर, राजाराम सुर्वे, कृष्णा धुरी, आदी वनमजूर सहभागी झाले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील वनमजुरांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरु केले आहे.