आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अंगामध्ये भगवा आहे. तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणारे नाही. महाराजांकडून तेजाचा, शौर्याचा एक कण जरी आपण घेतला; तरी आपण हुकूमशाहीला गाडून टाकू शकतो, असं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. माझी जनता ही माझ्यासाठी भवानीमातेने दिलेली तलवार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा ‘भगवा’ काय आहे, हे आता लाल किल्ल्यावर फडकवून दाखवणारच, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलं. ते सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेत बोलत होते.
शिवसेना कोणाची हे गद्दारांनी ठरवण्याची गरज नाही, जनतेला हे माहीत आहे. जनता हेच माझे सर्वस्व आहे. नसानसात गद्दारी भरलेल्यांना जनताच धडा शिकवेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. मिंधे जर शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करत असतील, तर ह्यांना राजकारणात गाडावंच लागेल. ही गाडण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. गुंडाच्या, लाचारांच्या देशा ही आमची ओळख नाही; ‘कणखर देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा’ ही आमची ओळख असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले. जर तुम्हाला हुकूमशहा नको असेल, तर ‘अब की बार भाजपा तडीपार‘ हा महाराष्ट्राचा नारा असला पाहिजे, असं आवाहान देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.
राणेंवर शेलक्या शब्दांत टीका
कोकण म्हणजे मी म्हणणाऱ्यांना वैभव नाईक यांनी घरी बसवलंय. आता त्यांचे काही राहिले नाही. त्यामुळे घाबरून राहायचे नाही. गुंडगिरी शिवसेनेने मोडीत काढली आहे, अशा शेलक्या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समाचार त्यांनी घेतला.
विकासरथ जनताच अडवून जाब विचारतेय...
आम्ही हिंदुत्व सोडले म्हणून ओरड मारायची आणि धर्माधमति भांडणे लावून द्यायची हे आमचे हिंदुत्व नाही. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप विकासरथ फिरवून आपली विकासकामे सांगत आहेत; पण यांचे विकासरथ जनताच अडवून जाब विचास्तेय, यावरून तुम्ही काय विकास केलात हे जनतेला कळले आहे असे सांगत भाजपने केंद्रात राबविलेल्या योजनांचाही ठाकरे यांनी समाचार घेतला. तसेच यातील अनेक योजना काँग्रेसच्या आहेत, फक्त्त नावे बदलली असे ठाकरे यावेळी म्हणाले.