सावंतवाडी : आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने काँग्रेससह शिवसेनेला धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष काशीनाथ तथा बाबल्या दुभाषी यांच्यासह शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख राकेश नेवगी व गणेश निंबाळकर यांनी आज शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दुभाषी, नेवगी यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेसह काँग्रेसला धक्का मानला जात आहे.यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी पक्षप्रवेश केलेल्या नव्या शिलेदारांचे स्वागत करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सामंत यांनी, स्वबळाची भाषा करण्यासाठी सध्याची परिस्थिती काय याची कल्पना सर्वांना आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी बळकट असताना देखील आमचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीकरून निवडणूका लढवायला प्राधान्य देत आहेत. काही काही लोकांना जर स्वबळाची खुमखुमी असेल तर त्यांनी त्याची परिक्षा घ्यावी, निवडणूका या पाच वर्षांनी येतच असतात असा टोला विरोधकांना लगावला.आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ, प्रत्येकाला आपल्या पक्षाचा विस्तार करायचा अधिकार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी वाढविण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न सुरू केले आहेत. आजच्या प्रवेशाने सावंतवाडीत राष्ट्रवादी पक्षाला आणखीन बळकटी मिळणार असल्याचेही ते म्हणाले.तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी येत्या काही दिवसांत असे अनेक पक्षप्रवेश पहायला मिळतील असे सांगितले.
कोकणात राष्ट्रवादीचा काँग्रेससह शिवसेनेला धक्का, माजी पदाधिकाऱ्यानी हाती बांधले घड्याळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 5:32 PM