सावंतवाडी : सावंतवाडी शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावत होती. ही समस्या आता नव्या नळ पाणी योजनेमुळे मिटणार असून शासनाने सावंतवाडी नगरपरिषद साठी नवीन नळ पाणी योजना मंजूर केली आहे ही नळ पाणी योजना मंजूर व्हावी म्हणून अनेकांनी पाठपुरावा केला त्याला यश आले असून या नळपाणी योजनेला मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातूनच मंजूरी मिळाल्याचे सांगत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मंत्री चव्हाण यांचे आभार मानले आहेत.साळगावकर यांनी मंत्री चव्हाण यांचे आभार मानले असले तरी एक प्रकारे मंत्री दीपक केसरकर यांना हा चिमटाच म्हणावा लागणार आहे.त्यानी या कामाचे श्रेय मंत्री दीपक केसरकर हे घेण्यापूर्वीच ते चव्हाण यांना दिल्याने ही एकप्रकारे मंत्री केसरकर यांची कोडीच म्हणावी लागेल.तर दुसरीकडे सावंतवाडी शहरातील भाजी मंडईच्या जागी होणाऱ्या संत गाडगेबाबा शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी उपलब्ध करण्यात आलेला निधी अपुरा असून सुसज्ज शॉपिंग कॉम्पेक्ससाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी ही या निमित्ताने साळगावकर यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मंत्री चव्हाण यांचे आभार मानले. स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वास घेण्यासाठी आपण बैठक घ्यावी व त्यांचे योग्य जागी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, व्यापारी महेश नार्वेकर, सचिन माडये आदी उपस्थित होते.दरम्यान, आंबोली येथील पर्यटन विकास महामंडळाने बांधलेल्या रिसॉर्टची सखोल चौकशी करण्यात यावी. तर शिरशिंगे धरण हे गेली २५ वर्ष प्रलंबित असून धरणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. तसेच धरणासाठी संपादित होत असलेल्या जमिनीचा भाग महाराष्ट्र शासनाने इतर ठिकाणी देऊन सदर धरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मंत्री चव्हाण यांचे आभार मानत केसरकरांची कोडी, सावंतवाडीतील नव्या नळपाणी योजनेला मंजुरी
By अनंत खं.जाधव | Published: May 06, 2023 6:15 PM