सावंतवाडी : आडाळी येथे एमआयडीसी होऊन दहा वर्षे उलटून गेले तरी तेथे उद्योग येत नाही. याला मंत्री दीपक केसरकर स्थानिक आमदार म्हणून जबाबदार असून, उद्योग येऊ नये म्हणून तेच वेगवेगळ्या मार्गाने खोडा घालत आहेत. त्यामुळे आडाळी येथील ग्रामस्थ काढत असलेल्या लाँग मार्चच्या पाठीशी असून आम्ही सत्तेवर असलो तरी या लाँग मार्चला पाठींबा देत असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी जाहीर केले आहे.ते शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, महेश धुरी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.तेली म्हणाले, स्वातंत्र्य दिनी ओरोस येथे बांदा येथे तालुका क्रीडांगण व्हावे म्हणून माजी उप सभापती शितल राऊळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. यावेळी मंत्री केसरकर यांनी तालुका क्रीडांगण सावंतवाडी येथे होणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या या हेकेखोरपणाला आंदोलनकर्त्यांनी विरोध दर्शविला.राज्याचे तत्कालीन क्रीडामंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तालुका क्रीडांगण व्हावे म्हणून मंजुरी देऊन बांधकामची १३ एकर जमीन क्रीडांगणासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. सावंतवाडी जिमखाना मैदानावर फक्त दीड एकर जमीन क्रीडांगणासाठी आहे. त्यामुळे बांदा येथे तेरा एकर जमिनीवर क्रीडांगण व्हावे म्हणून मागणी केली आहे. त्याला मंत्री केसरकर यांचा होत असलेला विरोध निरर्थक असल्याचेही तेली म्हणाले.जिल्ह्यात अनेक एमआयडीसी आहेत. पण त्याची अवस्था बघितली तर नवनवीन उद्योग यावेत यासाठी आडाळी एमआयडीसी सुरू होणे गरजेची आहे. मात्र दहा वर्षे उलटून गेली तरी अद्याप ही याठिकाणी विविध सोयीसुविधा देऊन ही उद्योजक का येत नाही याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे. हाकेच्या अंतरावर मोपा विमानतळ आहे. मग उद्योजक का येत नाही असा सवाल तेली यांनी केला.
आडाळी एमआयडीसीत मंत्री केसरकर खोडा घालताहेत, राजन तेलींचा आरोप
By अनंत खं.जाधव | Published: August 18, 2023 2:23 PM