सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातून भाजपाकडून इच्छुक असलेले माजी आमदार राजन तेली यांनी अखेर भाजपचा राजीनामा देऊन उद्धवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी सायंकाळी मुंबई येथील ‘मातोश्री’ वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, उद्धवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.सावंतवाडी मतदारसंघातून राजन तेली हे इच्छूक होते. मात्र, हा मतदारसंघ महायुतीच्या वाटाघाटीत शिंदेसेनेकडे जात असल्याने तेली नाराज होते. सावंतवाडी मतदारसंघात भाजपची मोठ्या प्रमाणात ताकद असताना हा मतदारसंघ शिंदेसेनेला न देता आपण लढविण्यात यावा, असा आग्रह त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे धरला होता.
मात्र, भाजपच्या नेत्यांनी त्याकडे फारसे लक्ष न दिल्याने तेली नाराज होते. त्यातच शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करत आणि नारायण राणे यांच्या घराणेशाहीवर बोट ठेवत भाजपाला रामराम करून उद्धवसेनेत प्रवेश केला.त्यातूनच त्यांनी उद्धवसेनेकडे चाचपणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते उद्धवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते. त्यातूनच शुक्रवारी त्यांनी हा प्रवेश केला. मुंबई येथे ‘मातोश्री’वर मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेली यांना शिवबंधन बांधले तसेच आगामी राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.राजन तेलींची १९ वर्षांनंतर घरवापसीराजन तेली यांनी नारायण राणे यांच्यासमवेत २००५ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची काँग्रेसकडून विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली. २०१४ साली काँग्रेसशी फारकत घेत त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादीत आणि त्यानंतर लगेचच भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता भाजपामध्ये दहा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी उद्धवसेनेत घरवापसी केली आहे.