सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून भरघोस मताधिक्य मिळाले त्याचे खरे श्रेय कार्यकर्त्यांना दिले पाहिजे तेच खरे मॅन ऑफ दी मॅचचे मानकरी आहेत. एकट्या दीपक केसरकर यांना यांचे खरे श्रेय कसे? असा सवाल आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्यावर माजी आमदार राजन तेली यांनी उपस्थित केला.तसेच कुणाला उमेदवारी हवी असल्यास पक्षाकडे मागा पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मिळत नाही असा सल्ला ही तेली यांनी संजू परब यांना दिला. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार नितेश राणे यांनी या विजयाचे श्रेय दीपक केसरकर यांना दिले होते. त्यावर शनिवारी तेली यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तेली म्हणाले, खरे म्हणजे शिंदे सेना व भाजप एकत्र आल्याने सावंतवाडी मतदारसंघात एक लाख मताचा टप्पा गाठणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. याची कारणमिमांसा केली जाईल पण जी मते पडली त्यामागे तळागाळातील विकास हेच मुख्य कारण आहे. त्याच बरोबर कार्यकर्त्यांची मेहनत ही म्हणावी लागेल. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मोठ्याप्रमाणात निधी गावागावात दिला. त्यामुळे लोकांची कामे झाली. पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना निधीसाठी झगडावे लागत होते. पण आता तसे होत नाही असे म्हणत त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली.2014 पूर्वी सावंतवाडी तालुक्यात भाजपची एकमेव ग्रामपंचायत निवडून यायची पण आता येथे शतप्रतिशत भाजप असून हे सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभे करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीतील यश हे एकट्या दीपक केसरकर यांचे नसून शिंदे शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांचे असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले.दरम्यान, राणे निवडून आल्याने आता विकास कामे जलद गतीने होतील रोजगार येतील आम्ही खास करुन आडाळी येथील एमआयडीसीत वेगवेगळे प्रकल्प आले पाहिजेत. लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी आग्रही असणार असून लवकरच या विषयासाठी खासदार नारायण राणे यांची भेट घेणार असल्याचे तेली यांनी सांगितले.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात चांगले मताधिक्य लोकसभा निवडणुकीत झाले पण शहरी भागात आम्ही कामी पडले यांचे मुख्य कारण अप्रचार आहे. तो आम्ही थांबविण्यात कमी पडलो या व्यतिरिक्त आणखी काही कारणे असतील त्याचा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत घेऊ असे ही तेली यांनी सांगितले.सावंतवाडी मतदारसंघात रोजगार हा विषय मोठा आहे.आडाळी एमआयडीसीत अत्तर तयार करणारी कंपनी आली असून त्यांनी आपला प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून ही कंपनी सुरू झाल्यास रोजगाराचा प्रश्न सुटेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली.
कार्यकर्ते मॅन ऑफ दी मॅचचे मानकरी, एकटे केसरकर नाहीत - राजन तेली
By अनंत खं.जाधव | Published: June 08, 2024 4:27 PM