सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांवर काल, मंगळवारी रात्री उशिरा ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.यामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार किंवा त्यापेक्षा जास्त जमाव केल्या प्रकरणी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ आणि २६८,२७०, पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी १८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयाच्या बाहेर जमलेली भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी व आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवल्या नंतर पोलिसांशी भाजपा कार्यकर्त्यांची झालेली बाचाबाची व बेकायदेशीर जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अन्य कारणे दाखवत पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घेतल्याप्रकरणी आपण सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भेट देणार व तक्रार देणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी दिली होती.नितेश राणे हे स्थानिक आमदार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या अधिकाराखाली त्यांना अडवला आहात, असा सवाल करत निलेश राणेंनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.
पोलीस-राणे कुटुंबातील संघर्ष वाढणार? निलेश राणेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 11:30 AM