कणकवली: राज्यात भाजप ,शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)या महायुतीचे सरकार आहे. आम्ही महायुतीत असूनही जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आम्हाला म्हणावे तसे सहकार्य लाभत नाही. त्यांनी उत्तर सिंधुदुर्ग मधील कणकवलीसह पाच तालुक्यातील विकासकामांबाबत लक्ष द्यावे. तसेच त्यांनी या भागाला मदत करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख महिंद्र सावंत, प्रा. विलास सावंत, किसन मांजरेकर आदी उपस्थित होते. सुधीर सावंत म्हणाले, मालवण येथील नौदलाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान सिंधुदुर्ग किल्ला नुतनीकरणाच्या अनुषंगाने काही करतील, अशी अपेक्षा होती. मात्र,तसे काही झालेले नाही. किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी यंत्रणा बनविण्याची आमची मागणीही होती .त्याबाबतचे निवेदन आम्ही त्यांना दिले. जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी दिवसेंदिवस उध्वस्थ होत चालली आहे. त्यामुळे समुद्र किनारा संरक्षित करण्याची गरज आहे. ओरोस तसेच अन्य शहरांच्या विकासाकडे कोणाचेच लक्ष नाही. जिल्हयातील अनेक जटील प्रश्न, धरणांसाठी निधी अशा अनेक गोष्टी असून यासाठी पालकमंत्र्यांनी एकत्रित बैठक घेऊन लोकसभा आचारसंहितेपूर्वीच्या दोन महिन्यात जेवढे होईल, तेवढे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे जनतेच्या हिताच्या दृष्टीने येथील विकासकामे मार्गी लागतील असेही सावंत म्हणाले.
Sindhudurg: महायुतीत असूनही पालकमंत्र्यांचे सहकार्य नाही, माजी खासदार सुधीर सावंतांनी व्यक्त केली खंत
By सुधीर राणे | Published: December 20, 2023 4:12 PM