सावंतवाडी : भारत जोडो यात्रेमुळे कॉंग्रेसला जरूर उभारी मिळेल पण थोडा उशीर झाला आहे. अनेक नेते पक्ष सोडून गेले. नेतृत्वाने सुरूवातीपासूनच याकडे लक्ष देणे गरजेचे होते. त्यामुळे पक्षातील अस्थिरतेचे वातावरण थांबले असते अशी खंत गोवा कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी व्यक्त केली. प्रादेशिक पक्ष संपवणे शक्य नाही. याला भारतातील जनताच मतपेटीतून उत्तर देईल असा टोला ही त्यांनी भाजपाला लगावला. माजी मंत्री खलप मंगळवारी सावंतवाडीत एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी वसंत केसरकर उपस्थित होते.
गोवा सरकारकडून तेथील गाड्या सिंधुदुर्ग व कारवार येथे बाहेर नेल्यास दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खलप यांना विचारले असता ते म्हणाले, सद्यस्थितीत गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना ते असह्य होत आहे. अनेकांनी विदेशात जाणे पसंत केले आहे. त्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या आता अन्य ठिकाणी वळविणे गरजेचे आहे. त्यासाठी कोकणकडे ही पर्यटकांची संख्या वळविल्यास गोव्यावरचा ताण कमी होईल आणि अन्य भागाचा विकास होण्यास मदत होईल असे खलप म्हणाले.
राजकारणात सद्यस्थितीत फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. सत्तेसाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. याबाबत त्यांना विचारले असता हा प्रकार काय नवीन नाही, पण दोन तृतीयांश सदस्य गेल्यांनतर पक्षच दुसर्या पक्षात विलीन होतो, असा काही जो नवा पायंडा पडत आहे तो योग्य नाही. आणि हे असेच सुरू राहिल्यास लोकशाहीला घातक ठरू शकते.
यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला. येणार्या निवडणूकीत फायदा होणार की नाही, हे मी सांगू शकत नाही.पण कॉंग्रेसला चांगली उभारी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून प्रादेशिक पक्ष संपवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला भारतातील जनते कडून योग्य उत्तर मिळेल असे सांगत फोडाफोडीचे राजकारण संपले पाहिजे अन्यथा प्रत्येक राजकीय पक्षांचे नुकसान होईल असेही खलप म्हणाले.