मंडणगड : तालुक्यातील पहिले व गेली चाळीस वर्षे पूर्णत्त्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिंचाळी धरणातील मुख्य विमोचक व सांडव्याच्या कामास सुरुवात झाली आहे. अपूर्ण कालवे पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत कालव्यांच्या माध्यमातून पाणी पोहोचण्याची येथील शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ १९७५ साली तांत्रिक मंजूर मिळालेल्या चिंचाळी धरण रडतखडत पूर्ण झाले खरे; पण कालव्यांचे काम अपूर्ण राहिल्याने हे पाणी विनावापर फुकट जात होते. कालव्याचे हे काम पूर्ण व्हावे, यासाठी गेली अनेक वर्षे कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर निधीचे प्रस्ताव जात होते. मात्र, निधीअभावी काम रखडले होते. अखेरीस हे काम आता सुरू झाले आहे.धरणाचे कालवे सुरु झाल्यास तीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून कालव्यांचा फायदा चिंचाळी, लोकरवण, म्हाप्रळ, कुंभार्ली पन्हळी या गावांना होणार आहे. या गावातील पाण्याचा प्रश्न आता मिटण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.यंदा अपूर्ण कालव्याच्या कामाला सुरुवात झाली असून, पावसाळ्यापूर्वी धरणात उपलब्ध पाणीसाठ्याच्या आधारे कालवे काम करतात की नाही याची तपासणीसुध्दा होणार असल्याची माहिती धरणाचे अभियंता राणे यांच्याकडून मिळाले असून, कालवे प्रवाहित होऊन पाणी शेतापर्यंत जाण्याची येथील शेतकऱ्याची चाळीस वर्षांची मागणी मार्गी लागणार आहे.या पाण्याचा वापर शेतीसाठीही होणार असल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
चाळीस वर्षांनी चिंचाळी कालव्यातून पाणी वाहणार
By admin | Published: April 08, 2015 9:46 PM