कणकवली : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्यासह मनसेच्या सातजणांवर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी दाभोलकर यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे, तर महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे यांना या गुह्याच्या प्रकरणी जेव्हा जेव्हा पोलिस स्थानकात बोलविण्यात येईल तेव्हा हजर राहावे, असे समजपत्र देण्यात आले आहे.मालवण तालुक्यातील आंगणेवाडी यात्रेत मनसेचे बॅनर लावण्यासाठी आपल्याकडे ५० हजारांची खंडणी मागितल्याची तक्रार कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांनी दिल्यानंतर पोलिसांनी राजन दाभोलकर यांच्यासह सातजणांवर बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद केला होता.कार्यकारी अभियंता प्रदीप सदाशिव व्हटकर (वय ५३, रा. कणकवली) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत राजन दाभोलकर यांच्यासह सातजणांनी आपल्याकडे ५० हजारांची मागणी केली होती. तसेच मार्च महिन्यामध्ये आपल्या शासकीय निवासस्थानातून राजन दाभोलकर २० हजारांची रक्कम घेऊन गेले होते, तर उर्वरित रकमेसाठी आपल्याकडे तगादा लावला होता.५० हजारांपैकी उर्वरित ३० हजारांच्या वसुलीसाठी बुधवारी (दि. १२ एप्रिल) राजन दाभोलकर तसेच एक महिला यांच्यासह ७ जणांनी आपली कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी त्यांनी विविध आरोप करीत आपल्याला धमकी दिली. तसेच पैशाच्या मागणीवरून यावेळी जोरदार खडाजंगीही उडाली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, त्यानंतर कार्यकारी अभियंता व्हटकर यांनी कणकवली पोलिस स्थानकात धाव घेत बुधवारी रात्री या घटनेबाबत तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्यानंतर राजन दाभोलकरसह ७ जणांवर संगनमत करून धमकी देणे, खंडणी मागणे अशा विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुरुवारी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर (कणकवली), अनिल राणे (हळवल), कणकवली तालुकाध्यक्ष समीर आचरेकर (कलमठ), महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अमित इब्राहमपूरकर (मालवण) यांना ताब्यात घेतले. तसेच चौकशीअंती त्यांना अटक केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संभाजी भोसले हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
मनसे जिल्हाध्यक्षासह चौघांना अटक
By admin | Published: April 13, 2017 10:58 PM