सावंतवाडी : आरोंदा-शिपेतुवाडी येथे स्थानिक मच्छीमार ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार होड्या पकडून महसूलच्या ताब्यात दिल्या. ही कारवाई बुधवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. संबंधित वाळू माफिया गोवा हद्दीतील असून महसूल प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अलिकडेच तहसिलदार याच्या पथकाने आरोंदा खाडीपात्रात कारवाई करून एक होडी जाळली होती त्यानंतर ही दुसरी कारवाई आहे.तेरेखोल खाडीपात्रातील आरोंदा किरणपाणी येथे गोव्यातील वाळू माफियांकडून महाराष्ट्र हद्दीलगत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही अवैध वाळू उपसा मोठ्याप्रमाणात सुरू आहे.याबाबत अनेक वेळा मच्छीमार समाजाकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या या तक्रारीवरून महसूल विभागाकडून वेळोवेळी कारवाई ही करण्यात आली.
त्यानंतर आज पहाटे तीनच्या सुमारास आरोंदा शिपेतुवाडी येथील स्थानिक मच्छिमार ग्रामस्थांनी गोव्यातील महाराष्ट्र किनाऱ्यालगत अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या चार होड्या व त्यावरील आठ कामगारांना पकडून महसूल विभागच्या ताब्यात दिले. यानंतर नायब तहसीलदार मुसळे यांनी आपल्या पथका समवेत घटनास्थळी दाखल होत वाळू उपसा करणाऱ्या होड्यांचे पंचनामे करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसाठी पुढील कार्यवाही सुरू केली.या कारवाईत नायब तहसीलदार मनोज मुसळे,महेश पास्ते, तलाठी आरोंदा,आजगाव,मंडळ अधिकारी यांच्यासह पोलीस बाबुराव जाधव जितेंद्र जाधव, भगीरथ मौळे मच्छीमार ग्रामस्थ नामदेव तारी, सिताराम तारी, अमित कोलंबकर, आदि सहभागी झाले होते.