सावंतवाडी, दि . २३ : आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप शुक्रवारी मध्यरात्री मागे घेतल्याने तब्बल चार दिवसांनी एसटीची लगबग सुरू झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपाचा फटका प्रवासीवर्गाला मोठ्या प्रमाणात बसला.
शाळा-महाविद्यालयांना सुटी असली तरी खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरदारवर्गाला या संपाचा मोठा फटका सहन करावा लागला. ऐन संपकाळात दिवाळी सण असल्याने आणखी त्रास सहन करावा लागला. लोकांनी नाईलाजास्तव खासगी वाहनांना पसंती दर्शविली.
मात्र, खासगी वाहनांकडून वारेमाप भाडे आकारण्यात येत होते. एकंदरीत प्रवासी वर्गाचे अतोनात हाल झाले. संपाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असताना हा संप मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत संप मागे घेण्याचा आदेश दिला. या आदेशावरून शुक्रवारी मध्यरात्री संप मागे घेतल्याने सावंतवाडी एसटी बसस्थानकात सकाळपासून बसची लगबग सुरू झाली.
सर्व ठिकाणच्या बस आपापल्या वेळेत गावागावात पोहोचल्याने प्रवासी वर्गानेही सुटकेचा नि:श्वास टाकला. याशिवाय चार दिवस शुकशुकाट निर्माण झालेले बसस्थानकही गजबजून गेले होते.
एसटी ऱ्यांनी संप मागे घेतल्याने तब्बल चार दिवसांनी सावंतवाडी बसस्थानक प्रवाशांनी गजबजले होते.