कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : फोंडाघाट तपासणी नाक्यावर कार्यरत असणाऱ्या पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीदरम्यान कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारमधील १४ लाख ४५ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. काल, बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई केली. ही रक्कम कोल्हापूर येथील एका व्यापाऱ्याची असल्याची बाब समोर आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात माल दिल्यानंतर त्या व्यापाऱ्यांकडून घेतलेली रक्कम कोल्हापूर येथे नेत असताना तपासणी नाक्यावर कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी नितीन बनसोडे व उद्देश कदम यांनी ही कारवाई केली.
पोलिस निरीक्षक मारुती जगताप व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेबाबत कळविण्यात आले. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्या रकमेबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांचे पथक कणकवलीत दाखल झाले होते. तसेच संबंधित व्यापाऱ्याकडे त्या रकमेबाबतची काही कागदपत्रे आहेत का? याची तपासणी करण्यात येत आहे.