कुडाळ : महामार्गाच्या चौपदरीकरणाचा जमीन गेलेल्या वेताळ-बांबर्डे येथील भूधारकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता वेताळ-बांबर्डे येथील महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू करू पाहणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या सुमारे २३ गाड्या वेताळ-बांबर्डेवासीयांनी सुमारे तब्बल ६ तास अडवून धरीत आंदोलन छेडले. व जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे काम सुरू करू देणार नसल्याचा इशारा दिला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे मात्र काही ठिकाणी अजूनही भूधारकांना त्यांचा मोबदला मिळाला नाही आहे. तसेच अजूनही काही ठिकाणी किती जमीन महामार्गाच्या चौपदरीकरणात घेतली जाणार हे याची माहिती काही भूधारकांना मिळालेली नाही. हीच परिस्थिती वेताळ-बांबर्डे येथे आहे.वेताळ-बांबर्डे येथील काही भूधारकांची मोठ्या प्रमाणात जमीन महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी घेण्याचे महामार्ग प्रशासनाने ठरविले आहे. मात्र सदरच्या जमिनीचा मोबदला अजूनही येथील भूधारकांना मिळाला नाही. तसेच कोणाची किती जमीन जाणार हे ही काही ठिकाणच्या भूधारकांना समजलेले नाही. असे असतानाच दिलीप बिल्डकॉन कंपनीने बुधवारी मध्यरात्रीपासून अचानक या ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणासाठी जमीन सपाटीकरण व झाडे तोडण्याचे काम हाती घेतले. येथील काही झाडे तोडुन टाकली.
गुरूवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हे सुरू असलेले काम येथील भूधारकांच्या तसेच ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत एकत्र येत आवाज उठवित आंदोलन सुरू केले.
यावेळी महामार्गावरून जाणारे दिलीप बिल्डकॉन कंपनीचे डंपर आंदोलकांनी अडवून धरले. सदरच्या या आंदोलनात प्रसाद गावडे, साजुराम नाईक, आपा पाटकर, संदीप गोडकर, रघुनाथ पाटकर, गणेश चव्हाण, आपा सामंत, निलेश उगवेकर यांच्याबरोबर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे या ठिकाणी काही काळ वातावरण तंग झाले होते.यावेळी आंदोलकांनी जोपर्यंत दिलीप बिल्डकॉन कंपनीचे तसेच महामार्ग प्रशासनाचे अधिकारी येऊन येथील भूधारक यांच्या मोबदला देण्याबाबत तसेच किती जमीन जाणार याबाबत ठोस निर्णय देत नाही. तोपर्यंत येथील काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका येथील घेतली. आंदोलन सुरू झाल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी तसेच बिल्डकॉन कंपनीचे अधिकारी कोणीच आले नाहीत.
काही वेळानंतर याठिकाणी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे तसेच पोलीस कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल झाले. याबाबत शुक्रवारी कुडाळ पोलीस ठाण्यात महामार्ग प्रशासनाचे अधिकारी व दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी व भूधारकांच्या यांची बैठक आयोजित करू असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतरच हे आंदोलन आंदोलकांनी तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले.२३ गाड्या अडविल्या ; सात तास आंदोलनआंदोलन गुरुवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून सुरू झाले ते दुपारी दोन वाजता संपले. यावेळी आंदोलकांनी दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या डंपर, पाण्याचे टँकर, क्रेन, काँक्रीट क्रेन मिळून सुमारे २३ गाड्या अडवून धरल्या होत्या. त्यामुळे लांबच लांब रांग या वाहनांची लागली होती.