सावंतवाडी : वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत तसेच थेट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. यात अनेक प्राण्यांना महामार्गावर वाहनांच्या धडकेत आपला जीव गमवावा लागला आहे. हे प्रकार सध्या वाढले असून गुरूवारी ही सोनेरी कोल्हा अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. ही घटना झाराप पत्रादेवी महामार्गावर मळगाव येथे घडली आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.जंगले नष्ट होवू लागल्याने निवाऱ्यासाठी वन्यप्राणी जंगलातून थेट रस्त्यावर येऊ लागले आहेत. दोन दिवसापूर्वीच झाराप पत्रादेवी महामार्गावर गवरेड्याचा कळप दिसून आल्याचे ताजे असतानाच आज सकाळी याच महामार्गावर चक्क सोनेरी कोल्हा मृतावस्थेत आढळून आला. या सोनेरी कोल्हयाला अज्ञात वाहनाने धडक बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा कोल्हा नर प्रजातिचा आहे.सावंतवाडी येथील प्राणिमित्र नवीद हेरेकर यांना ही घटना निर्दशनास आली. त्यांनी लगेचच त्याला उचलून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत ठेवले. वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर गाडी चालवताना प्राण्यांचा विचार करावा असे आवाहन हेरेकर यांनी केले आहे.
झाराप-पत्रादेवी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 5:41 PM