वेंगुर्ला : जिल्ह्याच्या आरटीओ विभागात कार्यरत असलेल्या एका एजंटकडे बनावट दस्तऐवज करीत चुकीच्या पद्धतीने गाडी रजिस्ट्रेशन करून मठ वेंगुर्ला येथील काजू कारखानदार रोहन बोवलेकर यांची फसवणूक करण्यात आली.
हा प्रकार चार दिवसांपूर्वी उघड झाला. दरम्यान, या प्रकरणी बोवलेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडीतील आरटीओ एजंट साईनाथ म्हापसेकर याच्याविरोधात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याला सिंधुदुर्ग आरटीओ अधिकारी जे. एम. पाटील यांनी दुजोरा दिला आहे. तसेच हा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही संबंधित एजंटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना बोवलेकर यांना दिल्या आहेत, असे सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी की, मठ येथे राहणारे बोवलेकर हे काजू कारखानदार आहेत. त्यांनी पर्वरी-गोवा याठिकाणी ६ जानेवारी २०१८ रोजी कार खरेदी केली होती. त्यांनी ही कार रजिस्ट्रेशन करण्यासाठी साईनाथ म्हापसेकर यांच्याकडे दिली. तसेच व्हीआयपी नंबर हवा असल्यामुळे त्यांनी नंबरचे पैसे आणि उर्वरित फी दिली.१८ जानेवारी २०१८ रोजी खास रजिस्ट्रेशन नंबर मिळण्यासाठी साईनाथ याने ७ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर गाडी घेऊन ओरोस येथील कार्यालयात तपासणीसाठी बोलावले. त्या ठिकाणी गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली. तसेच चेस नंबर घेतला आणि गाडी घेऊन जा, असे सांगण्यात आले.महिन्यानंतर साईनाथने रजिस्ट्रेशन झालेले परवाना पत्र आणून दिले. आणून दिलेल्या दस्तऐवजांवरून गाडीचा इन्शुरन्स नूतनीकरण करण्याकरिता मारुती इन्युरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोवा कार्यालयाकडे संपर्क केला. त्यावेळी ती गाडी अन्य व्यक्तीच्या नावे दिसली.
याबाबत साईनाथकडे चौकशी केली असता त्याने तुमच्या गाडीचा नंबर चुकून दुसऱ्या गाडीला दिलेला असल्याने मी तुम्हांला एमएच-०७-एजी ६९९९ हा नवीन नंबर रजिस्टर करून देतो असे सांगितले. परंतु ७ आॅगस्ट रोजी ११.३० वाजेपर्यंत परवाना पत्र आणून न दिल्याने बोवलेकर यांनी आरटीओ कार्यालय गाठले. तिथे ही गाडी अद्याप रजिस्ट्रेशन न झाल्याचे सांगण्यात आले.यावरून साईनाथ म्हापसेकर याने आपली फसवणूक केल्याप्रकरणी रोहन बोवलेकर यांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार ओरोस येथील पोलीस ठाण्यात म्हापसेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.