कणकवली : शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाचा व्यावसायिक दृष्टीकोनातून विचार करावा. दुधाळ जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन तंत्रशुद्ध व्यवसाय केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. त्यासाठी मुक्त गोठा पद्धत वरदान ठरेल, असे प्रतिपादन मॅक्रोट्रेनिंग सेंटर वाय. डी. पाटील डेअरी फार्म चिखलीचे यशस्वी शेतकरी अरविंद पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्यावतीने वागदे येथे आयोजित सिंधु कृषी, पशुपक्षी व पर्यटन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुक्त गोठा व्यवस्थापन व दुग्धशाळा या विषयावर आयोजित परिसंवादात पाटील बोलत होते. अरविंद पाटील यांनी गाई, म्हैशींच्या गोठ्याची रचना, चारा प्रक्रिया, मुक्त गोठा, बंदिस्त गोठा आदीं मुद्यांबाबत मार्गदर्शन केले. मुक्त गोठ्याची पद्धत राबविली तर जनावरांना धुण्याची, शेण उचलण्याची गरज राहत नाही. गुरे तणाव विरहित राहतात आणि दुधात वाढ होते. पाटील म्हणाले की, गुरांना फक्त सुका चारा दिल्यास त्यातून दुग्धोत्पादन वाढणार नाही. दुधातील फॅट वाढविण्यासाठी सुक्या चाऱ्यासोबत ओल्या चाऱ्याची आवश्यकता असते. तसेच खनिज मिश्रणाच्या वापरामुळे गाई, म्हैशींच्या शरीरातील खनिजद्रव्याचे प्रमाण समपातळीवर राहते. ओल्या चाऱ्याचा वापर करताना कडबा कुट्टी यंत्राचा वापर केल्यास चाऱ्याच्या नासाडीचे प्रमाण कमी होते. चाऱ्याची लागवड करताना यशवंत १, जयवंत व मक्याची लागवड केल्यास चांगली वैरण गुरांना मिळू शकते. गवतावर युरिया प्रक्रिया केल्यास चारा पौष्टिक होतो. गुरांना दिवसाला ३० किलो हिरव्या चाऱ्याची आवश्यकता असते. हिरव्या वैरणीपासून मूरघास तयार करण्याची पद्धत शेतकऱ्यांनी वापरावी. त्यामुळे उन्हाळी दिवसांत चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते. दुध देणारे जनावार ताणाखाली असता नये. त्यासाठी गोठ्याची शास्त्रोक्त रचना करावी. गोठ्याचे बांधकाम उत्तर-दक्षिण असे करावे. शेणापासून तयार होणारा मिथेन व मूत्रापासून तयार होणारा अमोनिआ वायूचा गुरांवर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी गोठ्यात हवा खेळती रहावी, असे पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. (प्रतिनिधी)चाऱ्याची समस्या : गवत प्रकारांची लागवड कराकोकणातील शेतकऱ्यांनी चाऱ्याची समस्या सोडवण्यासाठी आफ्रिकन मका, यशवंत, जयवंत असे मोठे वाढणारे गवताचे प्रकार लागवड करावेत. चाऱ्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी ‘मूरघास’ तयार करावी. गुरांना सारखी वैरण न घालता दिवसातून दोन ठरलेल्या वेळी द्यावी, असे पाटील यांनी सांगितले. फरशी, कॉँक्रीटवरून उठता-बसता जनावरांना दुखापत होऊ शकते. त्यासाठी रबर मॅटचा वापर फायदेशीर ठरतो. त्यावरून पायही घसरत नाही. पिण्यासाठी गाईला दिवसाला ६० ते ७० लीटर आणि म्हैशीला ५० ते ६० लीटर पाण्याची आवश्यकता असते. जनावरांचा माज ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गर्भाशयात दोष असल्यास तज्ञांकडून उपचार करून घ्यावेत. ६ महिन्यांपर्यंत दूध देणारी म्हैस जातीवंत समजली जावी. यासंदर्भातील नोंदी करणे आवश्यक असून गुरांचे दूध वाढवायचे असेल तर कृत्रिम रेतनाशिवाय पर्याय नाही, असे पाटील म्हणाले.
मुक्त गोठा पद्धत वरदान
By admin | Published: December 25, 2015 10:50 PM