अनंत जाधव ।
सावंतवाडी : कोरोना विषाणूमुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. रस्त्यावर वाहनांबरोबरच नागरिकही दिसत नाहीत. त्यामुळे सर्वत्र शांतता पसरली आहे. मात्र, या शांततेत केवळ पक्ष्यांचाच किलबिलाट ऐकू येत आहे. सावंतवाडी येथील मोती तलावात पाणकावळ्यांबरोबरच बगळ्यांचाही मुक्त संचार सध्या दिसून येत आहे. हे पाणकावळे तसेच बगळे मोती तलावात मुक्तपणे बागडत असतात. थोडीशी माणसांची किंवा गाड्यांची चाहूल लागली तरी त्यांचा थवा लांबच्या लांब भुर्रकन उडत असतानाचे दृश्य टिपण्याचे भाग्य क्वचितच मिळते.
संपूर्ण जगात सध्या कोरोनाने थैमान मांडले आहे. आपल्या देशातही दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे रस्त्यांवर सध्या माणसे, गाड्या दिसत नाहीत. सर्वत्र शांतता आहे. त्यामुळे प्राण्यांचे हाल होत आहेत.
मात्र, पक्ष्यांचा मुक्त संचार पहायला मिळत आहे. सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात तर मोठ्या प्रमाणात पाणकावळे व बगळेही आले आहेत. यापूर्वीही या तलावात हे पक्षी सर्वांना पहायला मिळत होते. पण त्यांच्याकडे कोणाची फारशी नजर जात नव्हती. मात्र, आता परिस्थिती बदलत चालली आहे.
मोती तलावात पाणबगळे थव्यांनी भ्रमण करतात. एखाद्या माणसाची चाहूल लागली तरी भुर्रकन उडून जातात. त्यामुळे हे दृश्य विलोभनीय असते. पाणबगळ्यांसह पाणकावळ्यांचीही मजा ही वेगळीच असते. मोती तलावात सध्या पाणकावळ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे पाणकावळे माणसांची चाहूल लागताच पाण्याच्या आतामध्ये जातात आणि एकदम बाहेर येतात.
सध्या कडक उन्हाळा असल्याने पक्षी जास्तीत जास्त वेळ पाण्यात रहात असतात. तसेच थवा करून आंघोळ करतात. या पक्ष्यांचा मुक्त संचार पाहून मन प्रफुल्लित होते.
सध्या मोती तलावाभोवती लोकांची गर्दी नसल्याने तलावाच्या सभोवतीच्या काठावर पक्ष्यांची शाळा भरली असल्याचे पहायला मिळते. सावंतवाडी शहरात आणि मोती तलावाच्या काठावर एरवी माणसांची गर्दी दिसून येते. मात्र, लॉकडाऊनमुळे माणसांऐवजी आता पक्ष्यांचीच गर्दी दिसत आहे.
तलावाभोवती शुकशुकाट
मोती तलावाच्या काठावरील झाडांवर बसून राहणारे बगळे सकाळी आणि सायंकाळी काठावर दिसतात. मात्र दिवसभर अन्नासाठी संचार करून सायंकाळी परत येत असताना पहायला मिळतात. सावंतवाडी शहराच्या सौंदर्यात भर घालणाºया मोती तलावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. पण सध्या तलावाभोवती शुकशुकाट दिसून येत आहे.