सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २०१३ पासून आतापर्यंत एकूण ८६८ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. यातील १२९ मुले ही हृदयरोग ग्रस्त होती तर ७३९ मुलांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.राष्ट्रीय आरोग्य अभियानाखालील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हामध्ये १२ तपासणी पथके कार्यरत आहेत. 0 ते १८ वयोगटातील बालकांना आरोग्य विषयक तपासणी व संदर्भ सेवा देण्यासाठी कार्यरत पथकामार्फत जिल्ह्यातील १५९७ अंगणवाडीमधील ४१ हजार २८५ मुलांची वर्षातून दोन वेळा व १७४४ शाळांमधील १ लाख २३ हजार १४ मुलांची वर्षातून एकदा तपासणी करण्यात येते.
या तपासणी दरम्यान किरकोळ आजार असणाऱ्या मुलांवर अंगणवाडी, शाळांमध्ये औषधोपचार करण्यात येतात. तसेच विशेष उपचारांची गरज असल्यास अशा मुलांना ग्रामिण, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविले जाते. अशा मुलांना व त्यांच्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन करुन मुलांच्या इतर प्रवगार्तील शस्त्रक्रिया व हृदयरोग शस्त्रक्रिया यांचा पाठपुरावा केला जातो.तपासणी दरम्यान आढळलेल्या संशयित हृदयरोगग्रस्त मुलांसाठी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग व बालाजी हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत २-डी इको तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.पाटील, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.जे.नलावडे, डॉ. एस.एस.पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. भुषण चव्हाण, डॉ. पंकज शहा व त्यांच्या चमुसह संतोष सावंत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक स्नेहा सावंत -भोसले, आरबीएसके पर्यवेक्षक, आरबीएसके कक्षातील जिल्हा स्तरीय तसेच तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा : चाकूरकरया शिबिरासाठी जिल्ह्यातील एकूण ५७ मुले उपस्थित होती. त्यापैकी ८ मुलांना शस्त्रक्रियेची गरज आहे. या मुलांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत बालाजी हॉस्पिटल, मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या मुलांच्या पालकांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी, जेणेकरुन मुलांच्या शस्त्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करता येतील असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.