गिरीष परब -- सिंधुदुर्गनगरी -जिल्हा परिषदेच्या लोकनियुक्त रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा शुक्रवारी पार पडल्या. मात्र, या स्पर्धेत नियोजनाचा अभाव असल्याने ही स्पर्धा सपशेल अपयशी ठरली. स्पर्धेच्या ठिकाणी प्रसाधनगृहाची नीट व्यवस्था नसणे, कर्मचाऱ्यांसाठी ना नाष्टा, ना जेवणाची सोय, त्यातच उशिराने पार पडलेल्या स्पर्धांच्या उद्घाटनाला जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण आरोग्य सभापती यांच्या व्यतिरिक्त इतर पदाधिकारी व सदस्यांनी फिरविलेली पाठ, यामुळे पदाधिकारी व अधिकारी यांच्यात उद्भवलेली वादाची किनार या स्पर्धेत दिसून आली. जिल्हा परिषदेमध्ये लोकनियुक्त प्रशासन नेमून फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त रौप्यमहोत्सवी वर्ष दमदार साजरे करण्याचे धोरण जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी अवलंबविले होते. यानिमित्त मनोरंजनात्मक कार्यक्रम, देशाच्या नकाशावर नाव कोरणाऱ्या माजी सरपंच, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्याचेही निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून हालचाली सुरु होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांचाही याला चांगला प्रतिसाद होता. दरम्यान, डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या विविध विषय समित्यांमध्ये विकासकामांचा मुद्दा हायलाईट करत पदाधिकारी सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. सभापती अंकुश जाधव यांनी तर टोकाची भाषा वापरत सीईओ शेखर सिंह यांना विकासकामांचा आढावा घेण्यास वेळ मिळत नसेल तर त्यांनी स्वत:ची बदली करून घ्यावी, असे खळबळजनक विधान केले होते. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २२ व २३ डिसेंबरला जाहीर झाल्या. यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी २ जानेवारीपर्यंत सुटीवर आहेत. सुमारे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेला कर्मचाऱ्यांसह अधिकारी वर्गालाही मोठी उत्सुकता होती. २२ रोजी जिल्हा क्रीडासंकुल येथे सकाळी १० वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ होणार होता. मात्र, अध्यक्षच उद्घाटन कार्यक्रमाला ११.३० च्या सुमारास पोहोचले. त्यातच कार्यक्रमस्थळी व्यासपीठ, बसण्यासाठी खुर्च्या नसल्याने एकंदरीत स्पर्धेचे नियोजनच ढिसाळ असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)क्रीडा स्पर्धेचा सिम्बॉलिक फोटो घ्यावाशेकडो स्पर्धक (कर्मचारी) सहभागी स्पर्धेसाठी ओरोस येथे शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते. खेळाडूंमध्ये उत्साह होता. मात्र, कुणाचा कुणाला ताळमेळ नसल्याने केवळ सोपस्कार म्हणून या स्पर्धा पार पाडण्यात आल्याचे दिसून आले. ना नाष्टा... ना जेवण...स्पर्धेच्या ठिकाणी प्रशासनाकडून नाष्टा व जेवणाची व्यवस्था न केल्याने कर्मचाऱ्यांना दोनवेळचा नाष्टा व जेवण स्वत:च्या पैशातून करावे लागले. भाडे न दिल्याने सभागृह केले होते बंद२३ रोजी क्रीडासंकुलाच्या सभागृहाचे भाडे न दिल्याने तेथील कर्मचाऱ्याने सभागृह खुले करण्यास मज्जाव केला. अखेर ही बाब स्पर्धेचे समन्वयक प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी क्रीडा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सभागृहाचे शुल्क भरत सभागृह खुले करुन घेतल्याची चर्चा आहे.प्रसाधनगृहाची गैरसोयस्पर्धेच्या ठिकाणी प्रसाधनगृहाची व्यवस्थाच नसल्याने कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्पर्धांचे बॅनरही कोठे लावलेले दिसत नव्हते. सामान्य प्रशासनाने जबाबदारी झटकलीकर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांची जबाबदारी ही जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे असते. मात्र, जिल्हास्तरीय स्पर्धा जाहीर झाल्यापासून दोन दिवसांपूर्वी स्पर्धेचे ‘मॉनिटरींग’ प्राथमिक शिक्षण विभागाच्या गळ्यात बांधून सामान्य प्रशासन विभागाने हात झटकले. स्पर्धांचे ‘लॉस्ट’ आदल्या दिवशीच जिल्हास्तरीय स्पर्धेची तारीख १६ व १७ डिसेंबरला जवळजवळ निश्चित झाली होती. मात्र, या दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागांमध्ये कामकाजाची पाहणी करण्यासाठी कोकण आयुक्तांची समिती आल्याने या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. स्पर्धेच्या आदल्या दिवशीपर्यंत प्रशासनाने प्रसिद्धीमाध्यमामार्फत तारीख जाहीर केली नव्हती. २१ रोजीच तालुक्यातील स्पर्धांचे लॉट काढण्यात आले. वादाची किनार कारणीभूत२०१३-१४ मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या होत्या. मात्र, या वर्षाच्या स्पर्धा या काहीशा निराशाजनक झाल्या. आणि त्याला जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील वादाची किनार कारणीभूत ठरली.
नियोजनाअभावी क्रीडा स्पर्धेचा फज्जा
By admin | Published: December 26, 2016 9:56 PM