बांदा : माणगाव-रायगड येथील बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी फरार असलेल्या प्रबोध प्रभाकर मोटे (३४, रा. तोरसे-पेडणे) या संशयिताला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने इन्सुली तपासणी नाक्यावर बांदा पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. मोटे याच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.महामार्गावर माणगाव-रायगड येथे ४ मे रोजी टेम्पोतून केल्या जाणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर रायगड येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई केली होती. त्यावेळी एकूण ७ लाख १२ हजार ७१२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
याप्रकरणी सागर देवजी तांदळेकर (३०) व शुभम स्वामीनाथ पाटील (२२) या दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील मुख्य संशयित प्रबोध मोटे हा फरारी होता. रायगड गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक ए. जी. वळसंग हे त्याच्या मागावर होते. मोटे हा सिंधुदुर्ग-गोवा राज्याच्या हद्दीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सावंतवाडी व इन्सुली तपासणी नाका येथे सापळा रचण्यात आला होता.पोलीस पथक प्रबोध मोटे याच्या सोमवारी सकाळपासूनच मागावर होते. मात्र तो सतत पथकाला गुंगारा देत होता. त्याचे मोबाईल लोकेशन तपासले असता सर्वप्रथम तो कोलगाव येथे होता. त्यानंतर माडखोल व मळगाव येथे गेला. त्याच्या ताब्यातील चारचाकी त्याने मळगाव येथे बदलली व दुसरी आलिशान मोटार घेऊन तो मळगावहून गोव्याच्या दिशेने जात होता.इन्सुली तपासणी नाका येथे तेथील कर्मचारी अमोल बंडगर यांनी गाडी तपासणीसाठी थांबविली. मात्र त्याने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. गुन्हे अन्वेषण पथकाने बांदा पोलिसांच्या सहाय्याने त्याला ताब्यात घेतले. बांदा पोलीस ठाण्यात अटक करून त्याला रायगड येथे नेण्यात आले.