कणकवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिन्ही उमेदवारांना ९५ टक्के गावांमध्ये चांगले मतदान झालेले आहे. त्यामुळे मनसेच्या उमेदवारांचा प्रचार प्रामाणिकपणे झाला. मात्र, धनशक्तीसमोर आमचा पराभव झाला. तरीदेखील पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रभावी विरोधक म्हणून आम्ही जिल्ह्यात काम करणार आहोत.
जरी राज्यात मनसेची सत्ता नसलीतरी रस्त्यावरील सत्ता आमचीच आहे. असे सांगतानाच तिन्ही आमदारांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल, असा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्गात निवडून आलेल्या आमदारांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळावीत. मनसे तरुण, महिला, वृद्ध सर्वसामान्य जनतेसाठी लढत राहणार आहे. या निवडणुकीत काल-परवा ज्या नेत्याविरोधात टीका करत होते. त्याच नेत्याचे गोडवे गाणारे नेते दिसले. त्यामध्ये जनतेचा विश्वास या सगळया प्रक्रियेत उडालेला आहे.शिवसेना-भाजपला शिव्या घालणारे काही लोक आता त्यांचे भक्त बनले आहेत. त्यामुळे दिलेल्या वचनाला या आमदारांनी बांधिल राहण्याची गरज आहे. जोपर्यंत जनतेचे प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. सत्ता कोणाचीही आली तरी जिल्ह्यातील प्रश्नांसाठी आम्ही लढत राहणार. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानतो, असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.