सावंतवाडी : गोव्यात भाजपने छोट्या घटक पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला असला तरी आम्ही सतर्क आहोत. स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे. पण भाजप आम्हाला सोडणार नाही, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. पुढील पंधरा दिवसांत कोकणातील मत्स्य विभागातील सर्व पदे भरणार असल्याचे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.
वेंगुर्ले येथील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी मंत्री महादेव जानकर हे सावंतवाडी आले होते. त्यावेळी त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी आमदार वैभव नाईक, अतुल हुले, संजय भोगटे, राजन पोकळे आदी उपस्थित होते. मंंत्री जानकर म्हणाले, एलईडी मच्छिमारीला सरकारने पूर्णपणे लगाम घातला आहे. त्यामुळे यापुढे एलईडी मच्छिमारी दिसणार नाही. राज्यात सध्या मत्स्य बीज घटले आहे. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. पण हे मत्स्य बीज वाढावे यासाठी आम्ही विविध स्तरावर उपाययोजना करत आहोत. प्रथमच आम्ही मत्स्य धोरण जाहीर केले असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
आंध्रप्रदेश व तामिळनाडूच्या तुलनेत मत्स्य विभागात अधिकाºयांची कमी होती. पण आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी यांची पदे भरण्यात येणार आहेत. पहिल्या टप्यात येणारे अधिकारी हे सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यासाठी दिले जातील पुढील पंधरा दिवसांत अधिकाºयांच्या नेमणुका होणार असल्याचे मंत्री जानकर यांनी सांगितले. मत्स्य खाते यापूर्वी देशात १९ व्या नंबरला होते पण आता हा विभाग देशात चौथ्या नंबरवर आला आहे, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गोव्यात भाजपने छोट्या घटक पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तशी परस्थिती महाराष्ट्रात आली तर यावर मंत्री जानकर यांनी आपली स्वबळावर लढण्याची तयारी आहे. आम्ही सतर्क आहोत पण भाजप आम्हाला सोडणार नाही गोव्याची आणि महाराष्ट्राची परस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, असे ही यावेळी जानकर यांनी स्पष्ट केले. पशुवैद्यकीय विभागाकडेही अधिकाºयांची संख्या कमी आहे. गेली अनेक वर्षे या विभागात भरती झाली नाही. मात्र आम्ही खास परवानगी मागितली आहे. या विभागातही लवकरच पदे भरली जातील, असे ही जानकर यांनी सांगितले.