मालवण : शहरातील रखडलेल्या भुयारी गटार योजनेचे काम हे ८० टक्के पूर्ण झाले आहे. अंतिम टप्प्यातील कामासाठी केंद्रशासनाकडून निधी मंजूर झालेला नाही. उर्वरित निधी न मिळाल्याने पालिका तिजोरीतून कोट्यवधी निधी खर्ची घालण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष अशोक तोडणकर व सुदेश आचरेकर यांनी नगरपालिका प्रशासन विभागाचे संचालक वीरेंद्र सिंह यांच्याकडे केली. नगरपालिका प्रशासन विभागाचे संचालक वीरेंद्र सिह हे गुरुवारी मालवण दौऱ्यावर होते. पालिकेच्या महत्त्वाकांक्षी व कोट्यवधी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेसह अन्य विकास योजना व प्रकल्पांचा आढावा सिंह यांनी घेतला. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे तसेच पालिकेतील सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते. रखडलेल्या भुयारी योजनेचे काम ठप्प असून तातडीने निधी देण्यात यावा, अशी मागणी करताना पालिकेच्या अन्य विकास प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणीही नगरसेवकांनी केली. बैठकीनंतर सिंह यांच्याशी शहरातील रखडलेल्या विकासकामांवर नगरसेवकांनी चर्चा केली. यावेळी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, मंदार केणी, नितीन वाळके, पूजा करलकर, महानंदा खानोलकर, संतोषी कांदळकर, दर्शना कासवकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रिक्त पदांबाबत चर्चानगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी पालिका प्रशासनातील रिक्त पदे भरण्यात यावीत अशी मागणी केली. यावर संचालक वीरेंद्र सिंह यांनी राज्यातील पालिकांची रिक्त पदांबाबत जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरु असून लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील असे स्पष्ट केले. शहरात ४२ किमीचे रस्ते असून पालिकेच्यावतीने २९ किमीचे रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांसाठी ६ कोटी रुपये निधीची आवश्यकता असून या कामासाठी निधी मिळणे गरजेचे आहे. तसेच मालवण धुरीवाडा येथे प्रस्तावित क्रीडा संकुलासाठी शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी सिंह यांच्याकडे करण्यात आली.
शासनाने निधी द्यावा
By admin | Published: September 22, 2016 11:52 PM