चिपळूण : संत गाडगेबाबांनी गृहत्याग करुन संन्यास घेतला. तीर्थाटन, भ्रमंती करताना वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. लोकांना मदत करुन कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते निघून जात म्हणून ते कर्मयोगी होते. ते ज्या गावात जात ते गाव स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता व अंधश्रध्दा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी स्वत: सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा, भोळ्या समजूती, अनिष्ठ रुढी, परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, असे प्रतिपादन प्रा. विनायक होमकळस यांनी केले. चिपळूण पेठमाप, परिट आळी विठ्ठल मंदिरात संत गाडगेबाबा परिट समाज संस्था, जिल्हा रत्नागिरी शाखा, चिपळूणतर्फे गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तराम महाडिक, तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटेकर यांनी प्रतिमा पूजन केले. माजी आमदार रमेश कदम, जिल्हा परिषद शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, नगराध्यक्ष सावित्री होमकळस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लालमन नारोळे, परिट समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कदम, डॉ. संतोषकुमार निगडी, डॉ. संतोषकुमार हंकारे, डॉ. सतीश गरळे, डॉ. गुलाबसिंग सोळंके, डॉ. सुनील कोतकुंडे, डॉ. प्रमोदकुमार वर्मा, डॉ. पराग कर्नाड, डॉ. पल्लवी कर्नाड, डॉ. दरवाजकर उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी व जयंती सर्व शाळांमध्ये साजरी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल सभापती घोसाळकर यांचा, तर समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या माजी आमदार कदम, नगराध्यक्ष होमकळस यांचा विषेश सत्कार करण्यात आला. प्रा. होमकळस यांनी गाडगेबाबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. कीर्तनाच्या माध्यमातून गाडगेबाबा श्रोत्यांशी वऱ्हाडी भाषेतून संवाद साधत. त्यांना अज्ञानाची, त्यांच्यातील दुर्गुणांची जाणीव करुन देत. व्यसनाच्या आहारी जाऊ नका, कर्ज काढू नका, देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करु नका, जातीभेद व अस्पृश्यता मानू नका, असा उपदेशही ते करीत, असे होमकळस यांनी सांगितले.यावेळी झालेल्या आरोग्य शिबिराचा २०० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला. त्यांना औषधेही देण्यात आली. उपस्थित डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालय, आप्पा होमकळस, किशोर पिंपळे, राजू विखारे, दीपक आंबुर्ले यांनी सहकार्य केले. संस्थेचे जिल्हा सचिव दीपक कदम यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष संतोष कदम यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
गाडगेबाबांनी स्वच्छता समाजात रुजविली : विनायक होमकळस
By admin | Published: December 23, 2014 9:58 PM