शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

गणा धाव रेऽऽऽ...--कोकणातील गणेशोत्सव अनुभवावाच!

By admin | Published: September 10, 2016 11:10 PM

कोकणातील जाखडीला ग्लोबल टच

शिव-पार्वती यांच्या नावाने रसिकांच्या मनात मानाचे स्थान मिळवणारी, परमेश्वराची आळवणी करणारी आणि आळवणी करता-करताच मनोरंजन करणारी, तोंडी प्रसारातून ग्रामीण लोककला जिवंत ठेवणारी जाखडी आता हळूहळू काळाच्या ओघात नष्ट होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील रोजगारांचा अभाव आणि शैक्षणिक असुविधा यामुळे वाढत्या शहरीकरणाचा फटका वर्षानुवर्षे चालत आलेल्या या लोककलेला बसला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश तरूणवर्ग मुंबई-पुणे किंवा अन्य शहरांकडे वळत असल्याने गणपती उत्सवात घरोघर फिरणाऱ्या जाखडीचे प्रमाण खूपच घटले आहे.लहानपणी गणेशोत्सवासाठी आजोळी जाताना जी काही आकर्षणं असायची, त्यात जाखडीचाही समावेश होता. मुळात पावसाळ्यात कोकणातली खेडी प्रचंड लोभस दिसतात. अतिशय शुद्ध अशा त्या हवेतच जगण्याची उमेद देण्याची खूप ताकद असते. तिथे मनोरंजनासाठी टीव्ही, मोबाईलसारख्या गोष्टींची आवश्यकता भासत नाही. कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले जुने मित्र-मैत्रिणी, नात्यांचा गोतावळा एकत्र भेटायचा हमखास सण म्हणजे गणेशोत्सव. या एकत्र भेटण्याच्या आनंदाइतकाच आनंद मिळायचा तो दुपारच्या वेळेत येणाऱ्या जाखडीमुळे. लहान मुलेच नाही तर मोठ्या माणसांनाही जाखडीची प्रतीक्षा असायची.समाजा-समाजांची एकत्र वस्तीची (वाडी) प्रथा अजूनही ग्रामीण भागात दिसते. मेणेवाडी, शिंदेवाडी अशा एकामागोमाग एक जाखड्या यायच्या. गणपतीचे पाच किंवा सहा दिवस या जाखड्या दुपारच्या वेळेत नियमित येत असत. घरमालक जी काही बिदागी देईल, ती घेऊन खुशीने पुढचे घर गाठत असत. अनेकदा ही जाखडी घरासमोरच्या पडवीतच उभी राहायची. पडवीच्या मधल्या खांबाला टेकून नाल वाजवणारे दोघेजण, मुख्य गायक आणि त्याला साथ देणारे दोघे-तिघे बसत असत. परमेश्वराची आराधना करून जाखडीला सुरूवात होत असे. सुमारे अर्धा-पाऊणतास किंवा यजमान खुशीत असला आणि पैसे सोडणारा असला तर तासभरापेक्षाही जास्तवेळ जाखडी रंगत असे. जाखडीनंतर पानसुपारी आणि एकमेकांची विचारपूस करून या आनंदाची सांगता होत असे. जाखडीचा तो ठेका पुढच्या वर्षीपर्यंत मनात रूंजी घालायचा. माझं आजोळ हे प्रातिनिधिक झालं. कोकणातल्या खेड्यांमध्ये प्राचीन काळापासून हेच वातावरण होतं. ती जगण्याची एक समाजमान्य पद्धतच होती. गणेशोत्सवापर्यंत शेतीची कामे आटोपलेली असतात. कापणीला वेळ असतो. अशा काळात कष्टकरी समाजाला उत्पन्नाचं एक साधनच या लोककलेने दिलं होतं. खोताच्या शेतातली कामे आटोपल्यानंतरच्या काळात तरूणांना बिझी ठेवणारा, त्यातून उत्पन्न आणि आनंदही मिळवून देणारा हा लोककला प्रकार. त्याची तयारी दोन-दोन, तीन-तीन महिने आधी सुरू होते. कोणत्या ओळीनंतर स्टेप बदलायची हे ठरवलं जातं. जाखडीच्या प्रमुख नर्तकाच्या तोंडात असलेली शिट्टी वाजली की स्टेप बदलायची. कधी कधी मुख्य नर्तक हात उंचावून स्टेप बदलण्याचा संकेत द्यायचा. हे सारं मन लावून बघण्यासारखं होतं. कुठल्याही नृत्यशाळेत नाचाचे किंवा संगीताचे शिक्षण न घेतलेली ग्रामीण भागातील ही तरूण मुलं ठेका अचूक पाळायची ती केवळ सरावातून आणि जाखडीच्या आवडीतून.काही वर्षांपूर्वी त्यात थोडं आधुनिकीकरण आलं. पारंपरिक चाली बाजूला ठेवून प्रसिद्ध झालेल्या हिंदी गाण्यांच्या चालीवर जाखडी नाचायला लागली. यंदा तर अनेक गाण्यांनी ‘सैराट’ चाल घेऊन जाखडी नाचवली. जाखडीची वेशभुषा (ड्रेपरी) हाही एक बघण्यासारखा विषय. राजा-महाराजांसारखी झूल खांद्यावर घेतलेले, काहीवेळा राजेशाही थाटाचा मुकुट डोक्यावर घातलेले हे तरूण हा थाट लक्ष वेधून घेणाराच. त्यांच्या पायातील चाळ जाखडीनृत्याच्या आनंदात भर घालणारेच. आता हे सारं अभावानंच दिसायला लागलंय. कुठे-कुठे जाखडीची पथके अजूनही तग धरून आहेत. पण एकतर ती अगदी व्यावसायिक पद्धतीने आधुनिक जाखडी सादर करतात किंवा त्यात फक्त लहान शाळकरी मुलेच असतात.जाखडीचे हे प्रमाण कमी होण्यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील रोजगारच्या अनुपलब्धी. ग्रामीण भागातील तरूणांच्या हाताला काम राहिलंय कुठे? शेती हा ग्रामीण भागांचा मुख्य व्यवसाय. शेतीचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मुख्य व्यवसायच अंतिम घटका मोजत असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना पोटाची भूक भागवण्यासाठी शहराची वाट धरणं क्रमप्राप्तचं होऊ लागलं आहे. शहरात नोकरी करताना मग जाखडीचा सराव करता येत नाही. गणेशोत्सवाचे मोजकेच दिवस सुटी मिळते. त्यामुळे त्यांचा जाखडीतला उत्साह पूर्ण आटू लागला आहे. त्यात शहरात काम करतो म्हटल्यानंतर जाखडीत सहभागी होणं थोडं अप्रतिष्ठेचं वाटू लागलं आहे. त्यामुळे या लोककलेला आता उतरती कळा लागली आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाची दुरवस्था, हेही स्थलांतरामागचे मोठे कारण आहे. असंख्य खेड्यांमध्ये अजूनही चौथी-पाचवीपर्यंतच्याच शाळा आहेत. थोड्या मोठ्या खेड्यांमध्ये दहावीपर्यंतच्या शाळा आहेत. मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. त्यामुळेही अनेक लोक ग्रामीण भाग सोडून शहरांकडे वळू लागले आहेत. त्यामुळेही आता ग्रामीण भागातील जाखडीचा सूरही मंदावला आहे.- मनोज मुळ्ये, रत्नागिरी