कणकवली : कोकणात अत्यंत मोजक्या शहरात शास्त्रोक्त संगीत प्रचार आणि प्रसाराचे कार्य चालू असताना येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात येणारी मासिक गंधर्व संगीत सभा अल्पावधीतच मूळ धरू पहात आहे. सलग सत्तावीस मासिक सभा सायंकालीन सत्रात पार पडल्यानंतर येथील कानसेन रसिकांच्या आग्रहास्तव गंधर्व फाऊंडेशनने आशिये येथे प्रथमच सकाळच्या प्रहरी गंधर्व संगीत सभा आयोजिण्याचे धाडस केले होते. त्याला रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पं.राम देशपांडे, पं.उल्हास कशाळकर यांच्या तालमीत घडलेले त्यांचे शिष्य निषाद बाक्रे यांनी अत्यंत जबाबदारीने हि प्रातःकालीन रंगांची मैफिल रंगविली . ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीसोबतच इतर अनेक घराण्याची गायकी आत्मसात केलेल्या या कलाकाराने अत्यंत ताकदीने आणि सौदर्यपूर्ण आविष्काराने हि मैफिल रंगविली. त्यांना गोव्यातील युवा कलाकार चारुदत्त गावस यांनी संवादिनीसाथ आणि संकेत खलप यांनी तबलासाथ केली.या दरम्यान प्रसाद घाणेकर यांनी निषाद बाक्रे यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपला कलाप्रवास,कलाशिक्षण आणि कलाविचार उलगडला. राग आणि प्रहर यांची संगती अत्यंत सोप्या पद्धतीने रसिकांना शिकविली . संगीत परंपरेत गुरुशिष्य नात्याला अत्यंत महत्व आहे हे सांगून गुरुविणा भरकटण्याची शक्यता जास्त आहे हे नमूद केले. आजची पिढी हि अधिक सूज्ञ आहे आणि ती सर्व गोष्टी पारखून घेते असा आश्वासक विचारही त्यांनी मांडला.कणकवलीतील संगीत प्रेमी धनराज दळवी आणि कुटुंबीयांनी दीपा दळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या या २८ व्या गंधर्व संगीत सभेसाठी आशिये दत्तमंदिर येथे रसिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. हि सभा यशस्वी होण्यासाठी शाम सावंत , संतोष सुतार, सागर महाडिक, विलास खानोलकर, मनोज मेस्त्री, राजू करंबेळकर यांनी विशेष मेहनत घेतली.२९वी गंधर्व संगीत सभा १९ मे रोजी !११ मे रोजी प्रियांशु सांस्कृतिक संस्था, गोवा आणि गंधर्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्पण महोत्सवच्या निमित्ताने एक आगळी वेगळी संगीत पर्वणी रसिकांना दत्त मंदिर आशिये येथे सायंकाळी ४ते रात्री ९ या वेळेत अनुभवता येणार आहे. तसेच २९वी गंधर्व सभा १९ मे रोजी मुंबईतील प्रसाद राहणे यांच्या सतारवादनाने पार पडणार आहे. संगीत रसिकांनी या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने यावेळी करण्यात आले.
गंधर्व संगीत सभा रंगली, मुंबईच्या निषाद बाक्रेनी भरले संजीवक सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 4:48 PM
सलग सत्तावीस मासिक सभा सायंकालीन सत्रात पार पडल्यानंतर येथील कानसेन रसिकांच्या आग्रहास्तव गंधर्व फाऊंडेशनने आशिये येथे प्रथमच सकाळच्या प्रहरी गंधर्व संगीत सभा आयोजिण्याचे धाडस केले होते. त्याला रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ठळक मुद्देआशिये येथे गंधर्व संगीत सभा रंगलीमुंबईच्या निषाद बाक्रेनी भरले संजीवक सूर