बांदा : श्री गणरायाच्या आगमनाने सर्व वातावरण चैतन्यमय होऊन जाते. गणेश चतुर्थी सण हा देवाला भक्ताशी आणि माणसाला माणसाशी जोडणारा आहे. घरोघरी गणरायाची भक्तिभावाने पूजाअर्चा होते. परिवारामध्ये असलेल्या आगळ्या परंपरा सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. असाच एक परिवार म्हणजे मोरगाव-बागवाडी येथील ठाकूर परिवार. सण, उत्सव हा सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला, तर त्याचा उत्साह द्विगुणित व आनंददायक बनतो. एकात्मतेची परंपरा जपणारा हा मोरगाव-बागवाडी येथील २८ कुटुंबांचा एकत्रित साजरा होणारा गणेशोत्सव.या परंपरेचा आरंभ मोरगाव येथील यशवंत ठाकूर यांनी केला. मोरगाव येथे आपली वास्तू उभारून त्यांनी आपल्या कुटुंबीयांना या ठिकाणी गणेशोत्सव एकत्रित साजरा करण्याची प्रेरणा दिली. पुढे या कुटुंबाचा विस्तार होत गेला. मात्र, गणेशोत्सव एकाच ठिकाणी साजरा करण्याची परंपरा ठाकूर कुुटुंबीय आजही कायमस्वरूपी जपतात. आज या परिवाराची पाचवी पिढी हा उत्सव साजरा करीत आहे. परिवारात २८ कुटुंबे आहेत. मात्र, २८ बिऱ्हाडे असली, तरी गणराया व तुळशी वृंदावन मात्र एकच आहे, हे विशेष! (प्रतिनिधी)गणपतीच्या आगमनापूर्वीची सर्व तयारी एकोप्याने केली जाते. रंगरंगोटी, स्वच्छता, सजावट, आदी कामे कौटुंबिक आस्थेने केली जातात. पहिल्याच दिवशी सर्व कुटुंबांचा एकत्रित महानैवेद्य देवास अर्पण केला जातो. उत्सवाच्या खर्चाची तजवीज सामायिक असते. एकतेच्या परंपरेचा आदर्श ठेवणारा असा हा ठाकूर कुटुंबीयांचा गणपती समाजाला एकात्मतेचा संदेश देत आहे.
एकात्मतेचे प्रतीक असणारा गणेशोत्सव
By admin | Published: September 22, 2015 9:31 PM