कणकवली : ' मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया' चा गजर करीत रविवारी सायंकाळी कणकवली शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अकरा दिवसांच्या गणरायाना निरोप देण्यात आला.
कणकवलीतील जानवली तसेच गडनदी वरील गणपती साण्यावर व विविध वाड्यांमध्ये असलेल्या गणपती साण्यावर श्री गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात आले. तसेच गणराया विनवणी करीत पुढच्यावर्षी लवकर येण्याचे अभिवचन भाविकानी यावेळी घेतले.तालुक्यातील नांदगाव , वरवड़े , जानवली, साकेडी, फोंडा, तळेरे, कनेडी, हळवल , खारेपाटण आदी भागातहि रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकरा दिवसांच्या गणरायाना जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. रात्री उशिरा पर्यन्त विसर्जन मिरवणुका अनेक ठिकाणी सुरु होत्या.13 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत गणराया घरोघरी आले. गेले अकरा दिवस मोठ्या भक्तिभावाने गणरायाचे पूजन केले जात होते. घरोघरी आरती तसेच भजनाचे सुमधुर सूर उमटत होते. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच डबलबारी भजनाचे सामनेही आयोजित करण्यात आले होते.लहान थोर गणरायांच्या सेवेत दंग झाले होते. सत्यनारायण महापूजा तसेच इतर धार्मिक विधींचे आयोजनही या कालावधीत अनेक घरात करण्यात आले होते. त्यामुळे पुरोहितांची लगबग वाढली होती. वेळेचे नियोजन करून पुरोहितानी अनेक घरातील पूजा आटोपल्या.
गणरायांच्या सेवेत गुंतल्यामुळे अनेक भाविकाना गणेशोत्सवातील अकरा दिवस कसे सरले ते समजलेच नाही . त्यामुळे रविवारी विसर्जनाचा दिवस जवळ आल्यावर त्यांचे अंतःकरण भरून आले. रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा गणरायाची आरती करून विसर्जन स्थळा पर्यन्त श्री गणेश मूर्ती नेण्यात आली.ढोल ताशांच्या गजरात गणरायाची विसर्जन मिरवणूक अनेक ठिकाणी काढण्यात आली होती.फटाक्यांची आतशबाजी करीत ही मिरवणुक विसर्जन स्थळापर्यन्त नेण्यात आली. त्यानंतर गणरायाची आरती करून विसर्जन करण्यात आले.
उपस्थित भाविकाना प्रसाद वाटण्यात आला. त्याचप्रमाणे 'गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या ' असे म्हणत भाविक घरी परतले. दरम्यान, सतरा दिवसांनी तसेच एकविस दिवसानिही काही गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात येणार आहे.कड़क पोलिस बंदोबस्त !गणेशमुर्ती विसर्जणाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कणकवली शहरात कड़क पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलिस पथके तैनात होती. जानवली नदिवरील गणपती सान्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.एस.ओटवणेकर उपस्थित होते.मानाच्या संतांच्या गणपतीला निरोप !कणकवलीचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंबवाड़ी येथील मानाच्या संतांच्या गणपतीलाही जानवली नदिवरील गणपती सान्यावर निरोप देण्यात आला. टेंबवाड़ी येथून विसर्जन स्थळा पर्यन्त ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत पारंपारिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली. लहान मुलांबरोबरच महिला वर्ग बहुसंख्येने या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.नगरपंचायतकडून गणरायांवर पुष्पवृष्टि !कणकवली नगरपंचायतकडून श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी विविध गणपती साण्यांवर चोख व्यवस्था करण्यात आली होती. परमहंस भालचंद्र महाराज भक्त निवास येथे मण्डप उभारून विसर्जनासाठी जाणाऱ्या श्री गणेशमूर्तिंवर पुष्पवृष्टि करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.