ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 24 - तालुक्यातील गणेशगुळे येथील वजरेकर स्टॉपजवळ एस. टी.च्या प्रतीक्षेत असलेल्या सुरेखा सुरेश शिंदे (रा़ शिंदेवाडी) या ४० वर्षीय महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. आसपासच्या लोकांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्या पळून गेला. बिबट्याशी सुमारे दहा मिनिटे झुंज देणाऱ्या सुरेखा शिंदे यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.सुरेखा शिंदे भाजीविक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.त्या रोज सकाळी पहिल्या गाडीने रत्नागिरीमध्ये भाजी विक्रीसाठी येतात. सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे वजरेकर एस. टी. थांब्याजवळ आल्या. बसची वाट पाहत असताना बेसावध क्षणी सुरेखा शिंदे यांच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला चढवला़ सुरेखा शिंदे यांनी धाडस दाखवत बिबट्याला प्रतिकार केला़ तब्बल दहा मिनिटे त्यांनी बिबट्याशी झुंज दिली़ त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे आजुबाजूला असलेल्या घरातील लोकांनी वजरेकर थांब्याच्या दिशेने काठ्या घेऊन धाव घेतली़त्यामुळे बिबट्याने जंगलामध्ये पळ काढला़ बिबट्याशी झुंज देणाऱ्या सुरेखा शिंदे जखमी झाल्या.त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापती झाल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.बिबट्याचा हल्ला बछड्यांसाठीसर्वसाधारणपणे बिबट्या हा नरभक्षक नाही. तो माणसांवर हल्ला करत नाही. शिंदे यांच्यावर हल्ला करणारा बिबट्या मादी जातीचा होता. कदाचित आपल्या पिल्लांच्या (बछड्यांच्या) शोधासाठी हा बिबट्या आला असावा आणि सुरक्षिततेच्या भीतीने त्याने हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.