- सुधीर राणे कणकवली: चिपी विमानतळावरून सध्या सुटत असलेल्या विमानासोबतच १८ ऑगस्टपासून आणखी एका विमानाचे उड्डाण होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा विकासाला चालना देण्यासाठी येथून आणखीन विमानाची सोय करण्यात यावी.अशी मागणी आपण केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी केली होती . त्या मागणीला यश आले असून चाकरमान्यांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले .
कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नितेश राणे म्हणाले , चिपी विमानतळावरून ७० आसनी एक विमान उड्डाण करीत होते . परंतु खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातील पर्यटन वाढवायचे असेल तर अजून एखाद्या तरी विमानाचे उड्डाण चिपी येथून व्हावे. अशी विनंती आपण केंद्रीय मंत्र्यांना केली होती. त्यानुसार आता गणेशोत्सवासाठी हे विशेष विमान सोडण्यात येणार आहे . १८ ऑगस्टपासून या विमान उड्डाणाला सुरूवात होईल . सध्या नियमित सुटणारे विमान सकाळी ११.३० वाजता मुंबईहून उडते व १२.५० वाजता चीपी येथे पोहोचते. तर दुपारी १.३० वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते परत उडते व ३ वाजता मुंबईला पोहोचते . १८ ऑगस्ट पासून सोडण्यात येणारे विमान हे दुपारी ३ वाजता मुंबईहून सुटणार असून ४.२० वाजता चिपी येथे पोहोचणार आहे . तर ४.४५ वाजता मुंबईच्या दिशेने झेप घेणार असून सायंकाळी सहा वाजता मुंबईला पोहोचणार आहे . त्यामुळे जिल्ह्यात येणारे चाकरमानी व नागरिकांची गैरसोय बऱ्यापैकी दूर होणार आहे .
आपण केलेल्या मागणीनुसार केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे , एअर अलायन्सचे प्रमुख तसेच वीरेंद्र म्हैसकर , अदानी एअरपोर्ट व इतरांनी यासाठी जे सहकार्य केले त्या सर्वांचे आपण आभार मानतो. सध्याच्या ७० प्रवासी क्षमतेच्या बरोबरीने आणखी ७० प्रवासी क्षमता असलेले विमान आता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सकाळी कामासाठी आलेला माणूस सायंकाळपर्यंत परत मुंबईला जाऊ शकणार आहे . पर्यटनासोबतच चाकरमान्यांसाठी हे सोयीचे होणार आहे . त्यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले .