देवगड : देवगड तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. तालुक्यात सोमवारी श्री गणेशाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. यावर्षीही खड्डेमय रस्त्यातूनच बाप्पाला प्रवास करावा लागला.कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. देवगड तालुक्यातही या सणासाठी हजारोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. गणेशोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली.
काही ठिकाणी गणेशमूर्ती रविवारी सायंकाळपासून तर काही ठिकाणी सोमवारी सकाळपासून वाजतगाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत घरी नेण्यात आल्या. देवगड बाजारपेठही गणेशोत्सवाच्या निमित्ताने गजबजली आहे. देवगडमध्ये मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांमुळे दोन दिवस गर्दी होती.विविध आकारांची मखरे, विद्युत साहित्य, गणेश पूजेसाठी लागणारे साहित्य, फटाके, नैवेद्यासाठी लागणारे विविध पदार्थ, तोरणे आदींनी बाजारपेठ सजली होती. मात्र, गणेशोत्सवानिमित्त पहिल्या दिवशी दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट होता. गणेशोत्सव हा कोकणचा पारंपरिक उत्सव असल्याने व्यापाऱ्यांनीही गणेशाचे स्वागत करण्यासाठी आपली दुकाने बंद ठेवली होती.देवगड आगारात चाकरमान्यांना घेऊन आलेल्या गाड्यांचा ताफा दाखल झाला आहे. त्याचबरोबर या गाड्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठीही सज्ज आहेत. आगाराने चतुर्थी कालावधीत ठिकठिकाणी जादा गाड्याही सोडल्या आहेत.
पोलीस स्थानकातही श्रीगणेशाच्या मूर्तिची सोमवारी प्रतिष्ठापना करण्यात आली. तालुक्यात सर्वत्र गणेशाच्या आगमनाने गणेशभक्त आनंदीत झाले असून ठिकठिकाणी भजने, फुगड्या या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.देवगड-जामसंडे शहरात पावसाळी डांबराने खड्डे बुजविण्यात आले. मात्र, पावसाने सुरुवात केल्यामुळे व रस्त्यावर पाणी साचल्यामुळे जामसंडे पेट्रोलपंप आदी भागात खड्ड्यांची पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यातूनच गणरायाचे आगमन झाले. खाडीकिनारपट्टीलगत असलेल्या गणेश मूर्तिशाळांमधील बाप्पाचा प्रवास हा कालवी, मोंड, कट्टा, मळई असा खाडीमधून होडीने व छोट्या यांत्रिक नौकेने झाला.गणेशोत्सव कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विजयदुर्ग पोलीस स्थानकामध्येही पोलिसांच्या दिमतीला होमगार्ड फौज आहे. विजयदुर्ग-तळेरे महामार्गाच्या केंद्रस्थानी असलेल्या पडेल तिठा येथे पोलीस तैनात आहेत. विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक संतोष कोळी सहकाऱ्यांसमवेत गस्त घालत आहेत.उत्साहाला उधाणगणेशोत्सवानिमित्त घरोघरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आगमनापासून ते विसर्जनापर्यंत गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक गावांतील घरे या निमित्ताने उघडली गेल्याने गावातील वाड्या गणेशभक्तांनी गजबजल्या आहेत. गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे.