निकेत पावसकर तळेरे : लहानपणी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणारे प्रसंग अनेकदा येऊन जातात. योग्यवेळी मुलांना पालकांनी दाद दिली की मुलांच्या कलेला आणि प्रतिभेला पंख फुटतात. एक विस्मयजनक कलाकृतीची निर्मिती होते. असेच काहिसे घडले आहे नाधवडे चारवाडी येथील पाच वर्षाच्या मेधांश सतीश मदभावे याच्या बाबतीत.याबाबत माहिती देताना मेधांशची आई बाबा सांगतात, तळेरे येथील ह्यबलोपासनाह्ण या संस्कार वर्गात मातीचा नागोबा करण्यास येऊ लागल्यावर आपल्याला गणपती बनवायचा आहे असा अट्टाहास मेधांश याने केला. मग आम्हीही मेधांशची इच्छा मनावर घेतली आणि मेधांशचे आजोबा मूर्तीकार उदय दुदवडकर यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार मेधांश याने वर्तमानपत्रांच्या कागदांचा लगदा व माती यांपासून सव्वा फूट उंचीची निसर्गमैत्र (इकोफ्रेंडली) गणेशमूर्ती साकारली आहे.अलिकडे मुलांना मोबाईलवरील खेळ सर्वाधिक आवडतात. मात्र, मेधांश याला त्यासोबतच चित्रकला, हस्तकला, मूर्तिकला, कॉम्प्युटरवरील खेळ यांची आवड आहे. तळेरे येथील बलोपासना या संस्कार वर्गात इतर मुलांसहित मेधांश याला चित्रकलेबरोबर मूर्ती कलेचे मार्गदर्शन संस्कार वर्गाचे प्रणेते मूर्तिकार ज्योतिष्याचार्य उदय दुदवडकर यांच्याकडून मिळाले.
मेधांश यांच्यां शेजारी नाधवडेतील सुनील मेस्त्री यांची गणेश चित्रशाळा आहे. सुनील मेस्त्री गणपती करीत असताना त्यांच्या कामाचे निरीक्षण मेधांश करीत असे. मेधांश याने तयार केलेल्या मूर्तीसाठी सुनील मेस्त्री यांनी रंग व माती इत्यादी साहित्य पुरवून त्याच्या कलेला दाद दिली. मेधांशचे आजोबा चंद्रकांत मदभावे यांनीही मेधांश याला प्रोत्साहन दिले.कलाकृतीचे सर्वत्र कौतुकसुरुवातीला मेधांशने सहा छोट्या गणेशमूर्ती बनविल्या. या मूर्ती चढत्या क्रमाने मोठमोठ्या आकाराच्या बनविलेल्या होत्या. अखेर सातवी मूर्ती ही सव्वा फुट उंचीची बनवली व रंगवली. मेधांशला प्रोत्साहन म्हणून त्याने बनवलेली गणेश मूर्ती त्याचे आजोबा चंद्रकांत मदभावे यांनी गणेश चतुर्थीला पूजनासाठी घरी पूजनात ठेवली. मेधांशच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.