कणकवली : गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांना विनासायास खरेदी करता यावी तसेच कणकवली शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नियोजन केले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आली असून या नियोजनाबाबतच्या सूचनांचे काटेकोर पालन नागरिकांनी करावे असे आवाहन नगरपंचायतीच्यावतीने करण्यात येत आहे.कणकवली हे सिंधुदुर्गचे मध्यवर्ती आणि राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई , पुण्याहून खासगी वाहनांनी आणि रेल्वेने येणारे चाकरमानी कणकवली शहरात खरेदीसाठी येतात. गणेशचतुर्थी आधी कणकवली बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली आहे. गणेशोत्सवात नेहमीपेक्षा वाढत असलेल्या गर्दीमुळे कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक तसेच महामार्गावर अन्य ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते.
मात्र नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी गणेशचतुर्थीपूर्व घेतलेल्या नियोजन बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्यानुसार अप्पासाहेब पटवर्धन चौकात महामार्ग उड्डाणपुलाखाली मुख्य बाजारपेठ ते डीपी रोड दरम्यान सर्व्हिस रस्त्यावर भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.भाजी मार्केटच्या विरुद्ध दिशेला पटवर्धन चौकात दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था केली आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस , स्थानिक वाहतूक पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. बस स्थानकालगतच्या पेट्रोलपंपासमोर उड्डाणपूलाखालीआणि पटवर्धन चौक ते बँक ऑफ इंडियासमोरील सर्व्हिस रस्त्यावर रिक्षा पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
डीपी रोडवर दुतर्फा दोरी लावून कार पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. तर लक्झरीसाठी नरडवे रोडवर पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गणेशचतुर्थीला लागणारे सजावटीचे साहित्य आणि गावठी भाजी, चिबूड,शहाळी आदी साहित्य घेऊन लगतच्या खेडेगावातील विक्रेते येत असतात. या विक्रेत्यांना पटवर्धन चौकातच आझाद मेडिकलसमोरील उड्डाणपुलाखाली जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे .
कणकवली शहरातील पटवर्धन चौक आणि मुख्य बाजारपेठ येथेच खरेदीसाठी झुंबड उडते. साहजिकच याठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. मात्र यावर्षी खरेदीला येणाऱ्या ग्राहकांसाठी कणकवली नगरपंचायतने दुचाकी , चारचाकी पार्किंगची व्यवस्था पटवर्धन चौकालगत केल्यामुळे आपले वाहन पार्क करून खरेदी करणे ग्राहकांना सोपे जात आहे. आगामी काळातही नागरिकांनी या नियोजनाचे तंतोतंत पालन केल्यास सर्वांना होणारा त्रास टाळता येणार आहे.शासनाच्या नियमांचे पालन करा !गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. या कालावधीत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी शासनाने जनहितासाठी केलेल्या नियमांचे पालन करावे. नगरपंचायतीने केलेल्या नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.