मालवण : सागरी महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जमिनीत मातीचे भराव टाकून आणि कचºयाचे ढीगच्या ढीग टाकून कांदळवनाचा परिसरच बुजविण्यात आल्याची गंभीर बाब मालवणातील पर्यावरणप्रेमींनी उजेडात आणली.
याप्रकरणी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी संबंधितांवर कारवाई करून सात दिवसांच्या आत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल, असे स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी या महामार्गावर रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. यावेळी तहसीलदार अजय पाटणे यांनी पर्यावरण प्रेमींकडून निवेदन स्वीकारले.दरम्यान, ही कांदळवने बेकायदेशीर बुजविल्याप्रकरणाची दखल महाराष्ट्र सागरी क्षेत्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणच्या पर्यावरण विभागाने घेतली आहे. मालवणच्या सागरी महामार्गावरील भागात सीआरझेड कायद्याचे तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.मालवण शहरातील देऊळवाडा येथील सागरी महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या कांदळवनांचा भाग हा बेकायदेशीरपणे माती, कचऱ्याचा भराव टाकून बुजविण्यात आल्याचे समजताच मालवणातील पर्यावरणप्रेमी व सजग नागरिक एकत्र आले आहेत.
कोकण कांदळवन समितीसह तहसीलदार, कांदळवनकक्ष, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, मालवण पोलीस निरीक्षक, अधीक्षक उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगराध्यक्ष, मालवण नगरपालिका यांना निवेदन देऊन या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.याबाबत पर्यावरणप्रेमी अॅड. ओंकार केणी, भूगर्भ अभ्यासक प्रा. हसन खान, पर्यावरण अभ्यासक चंद्रवदन कुडाळकर, इको टुरिझमचे प्रसाद गावडे, लक्ष्मीकांत खोबरेकर, स्वाती पारकर यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.करू निसर्गाचे संवर्धन, वाचवू पर्यावरणसागरी महामार्गाच्या सभोवतालच्या कांदळवनामध्ये कचरा साठत गेल्यास पाणी पुनर्भरण प्रक्रिया कमी होऊन विहिरींचे पाणी कमी होईल. तसेच कचऱ्यातील विषारी घटक विहिरीचे पाणी प्रदूषित करतील, अशी भीती पर्यावरणप्रेमी लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी व्यक्त केली.सागरी महामार्गावर पूर्वी दिसणारे पक्षी, कोल्हे, कासव आता दिसत नाहीत, अशी खंत स्वाती पारकर यांनी व्यक्त केली.कांदळवन क्षेत्रात खारफुटीच्या झाडांमध्ये कार्बन डायआॅक्साईड शोषून घेण्याची क्षमता जास्त आहे आणि आॅक्सिजन सोडण्याची क्षमताही जास्त आहे, त्यामुळे पर्यावरणीय परिसंस्थेचे संवर्धन आणि संरक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे, असे चंद्रवदन कुडाळकर यांनी सांगितले. मालवणच्या निसर्गाचे संवर्धन करणे आणि कचरामुक्त ठेवणे ही मालवणी माणूस म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे, असे प्रसाद गावडे यांनी सांगितले.