खेड : इतर वाहनांना बाजू देण्याच्या प्रयत्नात एक गॅसवाहू टँकर रस्त्यातच उलटल्याची घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात घडली. उलटलेल्या टँकरमधून तत्काळ गॅसगळती सुरू झाल्यामुळे परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली. दोन्ही बाजूची वाहतूक त्वरीत थांबवण्यात आली. लोटेतील विनिती आॅरगॅनिक कंपनीच्या पथकाने केलेल्या प्रयत्नात गॅसगळतीचे प्रमाण कमी झाले. मात्र पूर्ण थांबले नाही. त्यामुळे परिसरातील तणाव कायम आहे. महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. अपघातग्रस्त टँकर (एमएच-४३/वाय २५३१) भारत गॅस कंपनीचा असून, तो मुंबईहून गोव्याकडे एल.पी.जी. घेऊन जात होता. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दोन आयशर टेम्पोंना बाजू देण्याचा प्रयत्न करीत असताना हा टँकर रस्त्याच्या बाजूलाच उलटला. कशेडी येथील घाट सुरू झाल्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील जमीन खचलेल्या ठिकाणानजीक हा अपघात झाला. या टँकरवरील गॅसची टाकी रस्त्याच्या बाजूला गटारात उलटून पडली (पान १० वर) आणि टँकरचा पुढील भाग (चालकाची केबीन) टाकीपासून वेगळी होऊन रस्त्याच्या मध्येच उलटला. यादरम्यान टँकरचा चालक रवी मच्छींद्र विटकर (२५, रा. अहमदनगर) याने उडी मारल्याने तो या भीषण अपघातातून बचावला. मात्र, या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली. यावेळी मोठा आवाज आल्यामुळे तत्काळ कशेडी पोलीस स्थानकातील वाहतूक पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत टँकरच्या टाकीतील गॅसला गळती सुरू झाली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवतामध्येही गॅस पसरल्याने आगीचा धोका निर्माण झाला. शिवाय परिसरात मानवी वस्ती असल्याने घबराट पसरली. रस्त्यावरही सर्वत्र गॅसचा वास पसरला. खेड पोलिसांनीही त्या ठिकाणी धाव घेतली. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत विनाशकारी असलेल्या या गॅसची गळती थांबविणे आवश्यक होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी घटनास्थळापासून दोन्ही बाजूला अर्धा किलोमीटर अंतरावरच वाहतूक थांबवली. पोलिसांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन पथकाला पाचारण केले. मात्र, गॅसचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक अनिश्चित काळासाठी थांबवली होती. अखेर आयत्या वेळी या वाहतुकीला पर्याय काढून कशेडीपासून खेडच्या दिशेने अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळशी-विन्हेरे-महाड मार्गे ही वाहतूक सुरू करण्यात आली. (प्रतिनिधी) चौकट विनिती आॅरगॅनिकच्या पथकाचे प्रयत्न वायूगळती रोखण्यासाठी खेड पोलिसांनी लोटेतील विनिती आॅरगॅनिक कंपनीच्या गॅसरोधक पथकाला पाचारण केले. या पथकाने बरेच प्रयत्न केले. त्यामुळे वायूगळतीचे प्रमाण कमी झाले, पण पूर्णपणे थांबले नाही. ज्या कंपनीचा हा टँकर आहे, त्या कंपनीशी पोलिसांनी त्याचवेळी संपर्क साधला होता. मात्र मुंबईहून त्या कंपनीचे पथक येईपर्यंत उशिरा होणार आहे. पाच महिन्यांपूर्वीच... गेल्या ९ जून २०१५ रोजी पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी येथील कशेडी घाटातील तीव्र वळण उतारावर खेडच्या रिलायन्स पेट्रोलपंपाकडे जाणारा टँकर कलंडून पेट्रोलगळती मोठ्या प्रमाणात झाली होती. चौकट उरणमधील पथकाचे प्रयत्न सुरू लोटे एमआयडीसीतील विनिती आॅरगॅनिक केमिकल कंपनीचे रसायन तज्ज्ञांचे पथक कशेडी येथे दुपारी दाखल झाले खरे, मात्र यामध्ये त्यांना फारसे यश आले नाही़ गॅसची मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने परिसरातील लोकांना धोका होऊ नये, म्हणून कशेडी पोलिसांनी उरणहून विशेष गॅस तज्ज्ञांचे पथक बोलाविले. हे पथक सायंकाळी सहा वाजता कशेडी येथे दाखल झाले. गॅसची गळती थांबविण्यासाठी तीन तासांहून अधिक कालावधी लागणार असल्याचे या पथकाने सांगितले. या पथकाने गळती थांबविल्यानंतर शिल्लक गॅस रिकाम्या टँकरमधून मुंबईतील भारत गॅस कंपनीकडे पाठविला जाणार आहे. खेड आणि कशेडीचे पोलीस, अग्निशमन दलाच्या गाड्या, रसायन तज्ज्ञ आणि गॅस तज्ज्ञांचे पथक येथे कार्यरत आहे. चौकट पोलिसांचे उपाशीपोटी प्रयत्न दुपारी अपघात घडल्यापासून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कशेडी तसेच खेड पोलीस कार्यरत होते. घटनास्थळाच्या आसपास खाण्यासाठी काहीही उपलब्ध नसल्याने केवळ चहा पिऊन हे पोलीस दिवसभर कार्यरत होते. रिकामा टँकर दाखल महाड एमआयडीसीमधील एक रिकामा गॅसवाहू टँकर कशेडी येथे मागविण्यात आला. तो सायंकाळी पाच वाजता दाखल झाला. खेड नगर परिषद, लोटे एमआयडीसी, खेर्डी एमआयडीसी, महाड एमआयडीसी, उरण एमआयडीसी येथील अग्निशमन दलाची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. १४११२0१५-आरटीएन-0१.जेपीजी खेड तालुक्यातील कशेडी येथे उलटलेल्या टँकरमधून होणारी वायूगळती थांबवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते.
कशेडीत गॅसवाहू टँकर उलटून वायू गळती
By admin | Published: November 15, 2015 12:41 AM