कणकवली : तालुक्यातील दिगवळे गावातील गावडेवाडी, राजंणगाव या वस्तीत गव्यांच्या कळपाने प्रवेश केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. दाजीपुर अभयारण्यातील गव्यांचे कळप कोकणातील भातशेतीचे नुकसान करू लागले आहेत. वनविभागाने या गव्यांच्या कळपांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.दिगवळे गावाची सीमा ही दाजीपुर अभयारण्याला लागून आहे. गतवर्षी २२ जुलैला पहाटे राजणंगाव येथे डोंगराचा कडा कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर जंगलमय भागातून रानटी जनावरे या मातीच्या कोसळलेल्या भागातून वस्तीत येत आहेत. यापूर्वी रानगाय शेतात येत होत्या. अलिकडे पावसाळा सुरू झाल्यानंतर गव्याचा कळप मानवी वस्तीच्या दिशेने येत आहे. सध्या या परिसरात अनेक गव्याचा कळप वावरताना दिसत आहे. त्यामुळे त्या परिसरात काहीसे भितीचे वातावरण आहे.
सिंधुदुर्ग: दिगवळे येथे गव्यांच्या कळपाचा वावर, भातशेतीचे करतायत नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 3:36 PM