सिंधुदुर्ग : ‘मॅन्ग्रोव्हज्’बाबत जनजागृती व पर्यावरणपूरक माहिती देत पर्यटन म्हणून पर्यटकांना कांदळवन सफर घडविणाºया वेंगुर्ले येथील स्वामिनी बचतगटाला कोल्हापूर येथील राष्ट्रीय परिषदेत मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ वनस्पतीशास्त्र अधिविभागातर्फे ‘मॅन्ग्रोव्हज् अॅण्ड कोस्टल रिसोर्सेस’ या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे उद्घाटन मॅन्ग्रोव्हज् सोसायटी आॅफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉ. ए. जी. उंटवाले यांच्या हस्ते झाले. मॅन्ग्रोव्हज्बाबत या परिषदेत सर्वांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरवही केला. यामध्ये वेंगुर्लेतील स्वामिनी बचतगटाचा समावेश होता. बचतगटाच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका श्वेता हुले यांच्यासह गटाच्या आयेशा हुले व स्नेहा खोबरेकर यांनी हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते स्विकारला.
कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत वेंगुर्लेतील स्वामिनी बचतगटाच्या अध्यक्षा श्वेता हुले यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी आयेशा हुले, स्नेहा खोबरेकर आदी उपस्थित होते. (प्रथमेश गुरव)