कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी जड अंत:करणाने गौरी-गणपतीना निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी ६६ हजार २६२ घरांमध्ये, तर ३७ सार्वजनिक मंडळांच्या गणरायांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येऊन मोठ्या उत्साहात पूजन करण्यात आले होते. गेले पाच दिवस ‘श्रीं’चा जागर सर्वत्र सुरू होता. शनिवारी गौराईचे आगमनही झाले. त्यानंतर रविवारी पारंपरिक पद्धतीने गौराईचे पूजन करण्यात आले. विविध गीतांच्या साथीने फुगड्याचा फेर धरत महिलांनी रविवारची रात्र जागवली आणि आपल्या मनातले मागणे गौराईजवळ मागितले, तर सोमवारी सकाळपासूनच गौराईच्या विसर्जनाचे वेध महिलावर्गाला लागले होते. विविध भाज्या व भाकरी नैवेद्यासाठी बनविण्यात आली होती. सायंकाळी गणरायाबरोबर गौराईला निरोप देण्यात आला.गेले पाच दिवस संपूर्ण वातावरणच भारावून गेले होते. ‘मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने आसमंत अगदी दुमदुमून गेल्याचा भास होत होता. आरती व भजनांचे सूर सर्वत्र ऐकू येत होते. त्यातच सोमवारचा दिवस उजाडला आणि पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली. गणरायासोबत देण्याच्या शिदोरीची तयारी करण्यात आली. सायंकाळी नद्या, समुद्र, तलाव, विहिरी आदी ठिकाणी ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. सात, नऊ, अकरा दिवसांनीही काही ठिकाणी गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. त्याबाबतचे नियोजन सुरू आहे. कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीवरील गणपती सान्यावर विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सुरक्षिततेचा उपाय म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होमगार्डही कार्यरत होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशीच काहीशी स्थिती होती. (वार्ताहर)
सिंधुदुर्गात गौरी-गणपतींना निरोप
By admin | Published: September 21, 2015 11:01 PM