कणकवली : कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी श्री गणराया पाठोपाठ गुरुवारी सोन पावलांनी गौरींचे आगमन झाले. श्री गणेशाची माता पार्वती, म्हणजेच गौरीचे स्वागत मंगलमय वातावरणात करण्यात आले.बुधवारी तसेच गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गौरींच्या देखाव्याची सजावट, फराळाचे पदार्थ करण्यात महिला मग्न असल्याचे दिसून येत होते. गौरीचा हा सण साधारणत: तीन दिवस अनेक घरी साजरा करण्यात येतो.
पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीपूजन व तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरिंचे विसर्जन केले जाते. गौरी पूजनाच्या दिवशी काहींच्या घरी फोटोतल्या, मुखवट्याच्या, उभ्या, सुगडाच्या, खड्याच्या तर काहींच्या घरी मातीच्या मुखवट्याच्या गौरी पूजल्या जातात. प्रथेप्रमाणे त्यांची स्थापना, पूजन व विसर्जन केले जाते.गौरींच्या सजावटीसाठी बाजारात वैविध्यपूर्ण साहित्य दाखल झाले असून, बुधवारी रात्री उशिरापर्यंत महिलांनी दागिने, साड्या, सजावटीचे साहित्य, फराळाचे पदार्थ, पूजेचे साहित्य, फळे, फुले आदींच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. गुरुवारीही काही साहित्याची खरेदी केली जात होती.गौरींच्या पूजनासाठी विविध भाज्यांचा नैवेद्यही दाखविला जात असल्याने बाजारात या भाज्या विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. तीन दिवस अगदी आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असताना तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र महिला वगार्तील काहिंच्या मनात गलबल सुरू असल्याचे त्यांच्या चेहºयावरून दिसून येत होते. गौरीशी अनेक महिलांची आंतरिक नाळ जुळलेली दिसून येत असते.अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी पूजनभाद्रपद मासात येणाऱ्या गौरींचे पूजन करतात. या व्रतातील पहिला टप्पा म्हणजे गौरींचे आवाहन असते. गुरूवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी गौरींचे आवाहन म्हणजेच आगमन झाले. या निमित्ताने सकाळपासूनच सुहासिनींची लगबग सुरु होती.ज्येष्ठ गौरीचे हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. तर कोकणात विशेषत्वाने सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी गौरीचे लाकड़ी मुखवटे पूजले जातात. या गौरीना साडी बरोबरच सौभाग्य अलंकार चढविले जातात.गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात. यावर्षी गौरी पूजन शुक्रवारी करण्यात येणार आहे. याच दिवसी' वसा' भरला जातो. तिसऱ्या दिवशी गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात. अशी अनेक ठिकाणी परंपरा आहे.
दरम्यान , गौरीच्या आगमनाच्या निमित्ताने महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गौरीचा जागर करण्यासाठी फुगडीचे फेर धरले जाणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी महिला वर्गाकडून सुरु आहे.