कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गवा ठार झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री १२.१५ वाजण्याचा सुमारास ओसरगाव गवळीवाडी येथील आंबेरकर दुकानासमोर घडली. अपघातानंतर वाहनासह चालकाने पलायन केले. महामार्गावर मृतावस्थेत पडलेल्या गव्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती सामजिक कार्यकर्ते बबली राणे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तत्काळ त्यांनी वनविभागाचे अधिकारी व वाहतूक पोलिसांना कळविले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या गव्याला बाजूला करत खोळंबलेली वाहतूक पूर्ववत केली.त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने मृत गव्याला उचलून ट्रॅक्टरमध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी दिगवळेत नेले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, अक्षय राणे, नितीन धुरी, चेतन राणे, सूरज कदम, हेमंत आंगणे, सुनील राणे आदी स्थानिक ग्रामस्थानी मदत कार्य केले.अज्ञातावर गुन्हा दाखल!अज्ञातावर वनकायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळताच उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, सहाय्यक उपवनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी आपले सहकारी वनपाल तानाजी दळवी, वनपाल सारीक फकीर तसेच वनरक्षकांसोबत तत्काळ घटनास्थळी जात मृत गव्याची पाहणी केली. घटनेचा पंचनामा करत मृत गवा दिगवळे येथील शासकीय रोपवाटिकेत आणण्यात आला. यावेळी वनरक्षक दळवी, शिंदे, राठोड, गावकर, वनमजुर शिर्के आदी उपस्थित होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केल्यानंतर मृत गव्याचे दहन करण्यात आले.
अज्ञात वाहनाच्या धडकेत गवा ठार, मुंबई-गोवा महामार्गावर ओरसगाव येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 12:59 PM