सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कणकवली वागदे येथील कृषी व पशु महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनेही सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महोत्सव काळात दुधाळ जनावरे, शेळ्या मेंढ्या पालनासाठी व्याज सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत व महोत्सवातील जिल्हा बँकेच्या स्टॉलवर ही जनावरे खरेदीसाठी झटपट कर्जाची सुविधा आणि तीही सवलतीच्या दरात उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, कर्ज विभागाचे प्रमुख प्रमोद गावडे आदी अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने महिलांना शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय तसेच शेळी मेंढी पालन व्यवसायास मोठा वाव असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. दुधाळ जनावरे, शेळ्या, मेंढ्या, शेती अवजारे खरेदीसाठी बँकेने व्याज सवलतीची योजना आणली ओहे. यात महिला कर्जदारांसाठी ३ टक्के सवलत तर पुरुष कर्जदारांसाठी २ टक्के सवलत म्हणजे १३ टक्के ऐवजी १० व ११ टक्के व्याजावर कर्ज पुरवठा झटपट करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच महोत्सवात जनावरे अथवा अवजारे खरेदी करणे सोपे होणार आहे. या कर्ज प्रकरणांवर कोणत्याही प्रकारची छाननी अथवा मूल्यांकन फी आकारण्यात येणार नाही. शेतकऱ्यांना सातबारा, ८ अ आणावा व या महोत्सवात झटपट व सवलतीच्या कर्ज सुविधेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.ट्रॅक्टर, शेतीपंप, पॉवरटिलर आदी अवजारांच्या खरेदीसाठी कोटेशनच्या ९० टक्केपर्यंत बँक कर्जपुरवठा करणार आहे. तर जनावरे खरेदीसाठी ५० हजार मर्यादा असली तरीही काही जाती जास्त किंमतीच्या असतील तर त्यानुसार कर्जाची मर्यादाही वाढविण्यात येणार असून जास्तीत जास्त दुधाळ जनावरांची खरेदी व्हावी व या जिल्ह्याचे दुग्ध उत्पादन वाढवावे म्हणून बँकेचा प्रयत्न राहणार आहे. या महोत्सवात किमान ५०० जनावरांची खरेदी व्हावी यासाठीही प्रयत्न राहणार असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या भात खरेदीसाठी जिल्हा बँक खरेदी विक्री संघांना ३ कोटी ५५ लाखांची हुंडी मर्यादा जिल्हा बँकेने मंजूर केली आहे. यातून शेतकऱ्यांना भाताचा चांगला दर मिळेल व शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ई पेमेंटद्वारे पैसे जमा होतील अशी माहितीही यावेळी सतीश सावंत यांनी दिली. बचतगटांसाठी कर्ज धोरणात बदल करण्यात आले असून बचतगटांसाठी व त्यांच्या सभासदांसाठी २० हजारवरून ही मर्यादा ३० हजारांपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)ऊस लागवडीबाबत मार्गदर्शनजिल्हा बँकेच्यावतीने महोत्सवात ऊस लागवड, दुग्ध शाळा व मुक्त गोठा व्यवस्थापन, शेळ्या मेंढ्या पालन मार्गदर्शन याविषयी तीन मार्गदर्शन शिबिरे होणार आहे. २४ रोजी दुपारी २.३0 वाजता ऊस, २५ ला सकाळी १0 वा. दुग्ध, २६ला सकाळी १0 वाजता शेळ्या मेंढ्या पालन.यासाठी विविध तज्ज्ञ मार्गदर्शक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
जनावरे खरेदीसाठी झटपट कर्ज मिळणार
By admin | Published: December 23, 2015 11:36 PM