रत्नागिरी : समाधानकारक पगार असूनही जनतेला वेठीस धरून भ्रष्टाचाराची कास धरणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्यभर ‘पगारात भागवा’ हे अभिनव अभियान सुरू केले असल्याची माहिती महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या अभियानाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, सध्या विविध अधिकारी, कर्मचारी यांना भ्रष्टाचार करताना रंगेहात पकडल्याची अनेक वृत्ते वाचनात येतात. ८० टक्के अधिकारी, कर्मचारी हे प्रामाणिकपणे काम करत असतात. मात्र, काही लाचखोरांमुळे सर्वच अधिकारी, कर्मचारी यांची प्रतिमा मलीन होते. अधिकारी, कर्मचारी यांना मिळणारा पगार हा समाधानकारक असतो. मात्र, तरीही जनतेला वेठीला धरून भ्रष्टाचार केला जातो, साहजिकच जनमानसात अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलीन झाली आहे, याचे कठोर आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे. ही प्रतिमा महासंघाच्या प्रतिमेस काळवंडणारी असल्याने महासंघाने हे अभियान जाणीवपूर्वक राबवण्यास सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.हे अभियान जूनमध्ये सुरू करण्यात आले असून, डिसेंबरपर्यंत हे अभियान राज्यभर सुरू राहणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून अभ्यासशिबिर, कार्यशाळा घेऊन अधिकारी, कर्मचारीवर्गामध्ये याबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. मात्र, ज्या अधिकारी, कर्मचारी यांच्यात सुधारणा होणार नाही, त्यांच्यावर जलदगती न्यायालयात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची महासंघाची मागणी असेल, अशी माहिती कुलथे यांनी दिली. यामुळे शासन, प्रशासनातील भ्रष्टाचार थोपवण्यास नक्कीच मदत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी कुलथे यांच्यासमवेत महासंघाचे कोकण विभागाचे सहचिटणीस गणेश राठोड, बृहन्मुंबईचे सुदाम टाव्हरे, महसूल विभागाच्या तहसीलदार प्रियांका कांबळे, रत्नागिरीचे तहसीलदार हेमंत साळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यांनतर सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी यांची या अभियानांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. (प्रतिनिधी)1महाराष्ट्रातही पाच दिवसांचा आठवडा, कर्मचारी, अधिकारी संघटना यांच्या कार्यालयासाठी दर्शवण्यात आलेली थकबाकी रद्द करणे, प्रगती योजनेतील ५४०० च्या ग्रेड पेची मर्यादा काढणे, या महासंघाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून, उर्वरित मागण्यांबाबत अभ्यास करून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.2या अभियानाचे सर्वत्र कौतुक झाल्याची माहिती कुलथे यांनी दिली. स्वच्छ आणि गतिमान कारभारासाठी रिक्त पद भरणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भात मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली असून, ७० विभागातील रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच ही पदे भरली जातील, असे कुलथे यांनी सांगितले.
लाचखोरांना चाप लावण्यासाठी ‘पगारात भागवा’
By admin | Published: October 27, 2015 11:26 PM