सावंतवाडी : सावंतवाडीतील मोती तलावात मंगळवारी रात्री तोल जाऊन पडलेल्या तन्वी विजय कांबळे (17)या मुलीचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला असून या मुलीची तिच्या नातेवाईकांकडून ओळख पटविण्यात आली आहे. दरम्यान मुलीचा मृतदेह बघून आईने रूग्णालयात एकच टाहो फोडला त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान येथील मोती तलावाच्या काठावर मोबाईल वर बोलत असतनाच तन्वी हिचा तोल जाऊन ती तलावात पडली यावेळी तिला बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले शेजारी असलेल्या दानिश राजगुरू याने ही तलावात उडी घेत तन्वीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न निष्फळ ठरला तन्वी पाण्याखाली गेली ती वर आलीच नाही.रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर पोलिस तसेच नागरिक ठाण मांडून होते.
कांबळे कुंटूंब हे मुळचे चंदगड तालुक्यातील आहे. तिची आई सावंतवाडीत येथे काम करते. तन्वी मिळून तिला चार मुली आहेत. ती येथील खासकीलवाडा भागात भाड्याने राहत होती. रात्री उशिरा ती घरी नआल्याने तिच्या आईने सकाळी शोधाशोध केली. यावेळी तिला तलावाकाठी आणून तन्वीचा मृतदेह दाखविण्यात आला. यावेळी तो मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचे ओळखले. तन्वीचा मृतदेह बघून आईने टाहोच फोडला आईच्या रडण्याने उपस्थितांचे मन चांगलेच हेलावून गेले.
यावेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, शेखर सुभेदार, सुमेध गावडे तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत कदम व नितीन कदम यांनी बोटीच्या सहाय्याने तिला मोती तलावातून बाहेर काढला. सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस संतोष गलोले, पोलीस विजय केरकर, होमगार्ड गणेश वेंगुर्लेकर व महिला पोलीस धनुजा ठाकूर यांनी पंचनामा केला.
त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी साठी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान तन्वी चे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून ती मंगळवारी येथील तलावाकाठी आली होती तिच्या सोबत अन्य होते का? याची माहिती मिळू शकली नाही मात्र ती तोल जाऊन पडल्याचे प्रथम दर्शनी दिसून येतो या घटनेनंतर तन्वीच्या आईची प्रकृती चांगलीच खलवली असून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.