कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर तळेरे येथे ट्रकची धडक बसल्याने शाळकरी मुलगी जखमी झाली. मुलीला धडक देऊन ट्रकसह पसार झालेल्या चालकाला पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने खारेपाटण येथे ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. तळेरे येथील श्रुती संजय पडवळ (वय १६) ही महामार्गावरून शाळेत जात असताना गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (आरजे १८ - जीए २२५६) तळेरे हायस्कूलनजीक तिला धडक दिली. त्यानंतर ट्रकचालक रामचंद्र आत्माराम जाट (४०, रा. धोलिया, राजस्थान) याने ट्रक घेऊन पलायन केले. या अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला आणि पोलिसांनाही कळविले. पोलिसांनी खारेपाटण चेक पोस्टवर नाकेबंदी केली. ही बाब ध्यानात येताच ट्रकचालकाने ट्रक तिथेच ठेऊन जवळच्या जंगलात पलायन केले. पोलिसांना ही माहिती समजताच त्यांनी ग्रामस्थांच्या साहाय्याने शोधमोहीम राबविली. दुपारी एकच्या सुमारास हा ट्रकचालक खारेपाटण जैनपार येथील स्मशानभूमीजवळ सुखनदीच्या काठी एका खड्ड्यात लपून बसलेला दिसला. पोलिस नाईक भगवान नागरगोजे, पी. जे. राऊत, जाधव यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कासार्डे पोलिस दूरक्षेत्रात त्याला आणण्यात आले. रात्री उशिरा या अपघातप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकने धडक दिल्यानंतर श्रुती पडवळ हिला तेथील ग्रामस्थांनी तातडीने कणकवली येथे उपचारासाठी हलविले. येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर तेथील ग्रामस्थ आपल्याला मारतील या भीतीने आपण पळाल्याचे ट्रकचालकाने पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)
ट्रकच्या धडकेत मुलगी जखमी
By admin | Published: October 09, 2016 11:25 PM