शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगांव पाडागरवाडी येथील जागृत श्री गिरावळदेवीचा वार्षिक डाळाप उत्सव शुक्रवार १३ डिसेंबर रोजी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या, मुक्तहस्ताने नैसर्गिक सौंदर्याची उधळण करणाऱ्या, अखंड बारमाही वाहणाऱ्या पाडागर सैतवडे धबधब्यापासून ५० फूट अंतरावर वरच्या बाजूला शिवगंगा पियाळी नदीच्या पात्रात जागृत श्री गिरावळ देवीचा चौथरा आहे. चौथऱ्यापासून जवळच असलेल्या नदीपात्रातील डोहात देवीची तीन पाषाणे आहेत. पावसाळा संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात ही पाषाणे डोहातून बाहेर काढून चौथऱ्यावर विराजमान केली जातात.वर्षातील सर्वसाधारण सहा महिने ही पाषाणे चौथऱ्यावर विराजमान असतात. त्यानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा नदीपात्रात ठेवली जातात. या दोन्ही वेळी डाळाप उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो. उत्सवासाठी शिरगांव गांवातील बारा वाड्यांतून शिधा गोळा करण्याची प्रथा आहे. गोळा केलेल्या शिध्याचा वापर महाप्रसादासाठी केला जातो.श्री गिरावळ देवीची अशीही आख्यायिका सांगितली जाते की, पाडागर येथून वाहणाऱ्या शिवगंगा पियाळी नदीच्या पलीकडच्या तीरावर ताम्हाणे गांव आहे. या गांवची श्री भराडी देवी ही श्री गिरावळ देवीची बहीण. पावसाळ्यात एक दिवस दुपारच्यावेळेला श्री गिरावळ देवी आपल्या बहिणीसाठी जेवण घेऊन नदीपात्र ओलांडत असताना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.
त्यामुळे या पाण्यात श्री गिरावळ देवी वाहत जाऊन एका डोहात स्थिरावली. पाडागर येथील कुंभार समाजातील गोठणकर घराण्यातील पूर्वजांना देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. त्यानुसार नदीपात्रातील डोहात तीन पाषाणे सापडली. ती पाळण्यात घालून नदीपात्रातून बाहेर काढून त्यांची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली.विविध धार्मिक कार्यक्रममार्गशीर्ष महिन्यात व पावसाळा सुरू होण्यापूर्वी अशा वर्षातून दोनवेळा साजरा होणाऱ्या डाळाप उत्सवाला सुमारे ४०० वर्षांची परंपरा असल्याचे येथील जुने जाणकार सांगतात. उत्सवादिवशी सकाळी श्री गिरावळ देवीची पूजा-अर्चा केली जाते. ओटी भरणे, नवसफेड, महाप्रसाद, नवीन नवस बोलणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या कार्यक्रमांना ग्रामस्थांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.