वेंगुर्ले : शिवसेना-भाजप युतीअंतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जागेवर शिवसेनेचे अर्जुन खोतकर दावा करीत आहेत. त्याप्रमाणे रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना सोडावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.
याबाबत ११ मार्च रोजी बंदर विकास मंत्री रवींद्र्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत मत मांडण्याचा निर्णय शनिवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप-सेना युती दुभंगण्याची चिन्हे दिसत आहेत.वेंगुर्ले भाजपा कार्यालयात आज आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती तसेच संभाव्य उमेदवाराच्या चाचपणीबाबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार तथा प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते नगरपालिका व ग्रामपंचायती या सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.आज गावपातळीवर राज्य व केंद्र्र यांच्या योजना केवळ भाजपा पक्षानेच यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपा सक्षम पक्ष असल्याचा दावा राजन तेली यांनी केला. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपने लढवावा व खऱ्या अर्थाने रोजगार निर्मिती करून देणारे सध्याचे वाणिज्य उद्योग तथा हवाई मंत्री सुरेश प्रभू यांना ही जागा द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
रत्नागिरी व सिंधुदुर्गातील गाववार कार्यकर्त्यांच्या बैठकीबाबत एकत्रित आढावा राज्याचे बंदर विकास मंत्री रवींद्र्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ११ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत दिला जाणार असून, हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस व भाजपा प्रदेश कार्यकारिणी यांच्याकडे पाठविला जाणार आहे.
त्यांच्या निर्णयानंतर या मतदारसंघात सेनेला संधी द्यावी की भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवावी, याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे केंद्र्रात व राज्यात भाजप-सेना युती असली तरी ही युती जिल्ह्यात दुभंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.